नवी दिल्ली : आयपीएलद्वारे पुन्हा टीम इंडियात परतण्याच्या झहीर आणि युवराजच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. झहीर खान आणि युवराज सिंग यांनी आयपीएलद्वारे पुन्हा संघात पुनरागमन होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
आय़पीएलच्या आठव्या सत्रासाठी दिल्ली डेअरडेविल्सकडून युवराजसाठी १६ कोटींची बोली लावण्यात आली तर चार कोटी रुपयांची बोली लावण्यात आलेला झहीरनेही दिल्ली डेअरडेविल्सच्या संघात स्थान मिळवले आहे. आयपीएलद्वारे संघात पुनरागमन करण्याची दोघांची इच्छा आहे.
"नक्कीच हो. जेव्हा मी शस्त्रक्रिया झाल्यानंतर भारतात परतलो त्यानंतरची दोन वर्षे माझ्यासाठी खडतर होती. मी सध्या खूप मेहनत घेत आहे. तसेच स्थानिक क्रिकेटमध्येही माझी कामगिरी चांगली राहिली आहे. मला विश्वास आहे की, मी चांगली कामगिरी करेन आणि पुन्हा संघात स्थान मिळवेन," असे युवराजने सांगितले.
तर संघात स्थान मिळवण्याच्या दृष्टीने आयपीएलमध्ये समावेश हे पहिले पाऊल असल्याचे झहीरचे म्हणणे आहे. "मी पुन्हा क्रिकेटचा आनंद घेत आहे. संघात स्थान मिळवण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकणे हे नक्कीच आयपीएल आहे", असे झहीर म्हणाला. झहीर २०१४ मध्ये न्यूझीलंडविरोधात अखेरचा सामना खेळला होता. तर २०१३ मध्ये युवराजने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.