www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
सोशल नेटवर्किंगमध्ये दिवसेंदिवस झपाट्यानं होणाऱ्या वाढीनं फेसबुकला मालामाल केलंय. आपण यु-ट्यूबचा व्हिडिओ प्ले केल्यानंतर जाहिरात सुरू होतांना पाहतो. आता अशीच जाहिरात फेसबुक अकाऊंटवरील एखादा व्हिडिओ पाहतांनाही आपल्याला दिसू शकते. कारण, व्हिडिओ जाहिरातींमधून मिळणाऱ्या उत्पन्नाची भुरळ फेसबुकलाही पडली आहे. जाहिरातीचे स्लॉट विकून दररोज २५ लाख डॉलर कमावण्याची योजना फेसबुकनं तयार केलीय.
फेसबुकनं अजून व्हिडिओ जाहिरातींची योजना जाहीर केली नसली, तरी या वर्षामध्ये फेसबुकवर व्हिडिओ जाहिराती सुरू होतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. जगभरात फेसबुकचे ११५ कोटी युजर्स आहेत. फेसबुकच्या युजर्समध्ये रोज अकाउंट पाहणाऱ्या युजर्सची संख्याही कोटींच्या घरात आहे. फेसबुकच्या सीओओ शेरील सँडबर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील तीन महिन्यांमध्ये ६१ टक्के युजर्सनी दररोज आपल्या फेसबुक अकाऊंटला भेट दिली होती. एकट्या अमेरिकेमध्ये ८ ते १० कोटी युजर्स दररोज रात्री फेसबुकला भेट देतात. हा आकडा लक्षात घेता टीव्हीप्रमाणेच जाहिरातींसाठीही `प्राईम टाईम` निश्चित करण्याचा फेसबुकचा विचार आहे.
मात्र जाहिरातींमुळं फेसबुकच्या रोजच्या वापरात फरक पडता कामा नये, याकडे फेसबुकचे सीईओ झुकेरबर्ग यांचं लक्ष आहे. म्हणूनच, आतापर्यंत दोनवेळा या योजनेच्या अंमलबजावणीची तारीखही पुढं ढकलण्यात आलीय. आता लवकरच परिपूर्ण योजनेसह फेसबुकवर जाहीराती आपल्या भेटीस आल्यास आश्चर्य वाटून घेऊ नये.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.