www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सध्या व्हॉटस् अप आणि फेसबुकवर फिरणारी पोलीस भरतीची जाहिरात पाहून तुम्हीदेखील खूश झाला असाल तर सावधान! कारण, ही जाहीरात धादांत खोटी असल्याचं आता समोर आलंय.
थोड्याच वेळात जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधण्याची साधनं म्हणजे फेसबुक, ट्विटर आणि मोबाईलवरचं व्हॉंटसअप... या अत्याधुनिक साधनांमुळे एखादी माहिती कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवता येते. पण, हेच आता धोकादायक ठरू लागलंय.
`नोकरी हवीय? आजपासून ऑनलाईन पोलीस भरती` अशी जाहिरात पाहिली आणि तरुणांना आनंद झाला. सरकारी नोकरीसाठी इच्छुक आणि बहुप्रतीक्षेत असणार्या युवकांसाठी काही दिवसांपासून फेसबुक आणि व्हॉटसअपवर पडलेल्या पोलीस भरतीच्या जाहिरातीनं सुखद धक्का दिला होता. राज्य पोलीस दलात तब्बल १५,४६५ जागांसाठी ऑनलाईन पोलीस भरती करण्यात येणार, ही खूशखबर ऐकून उत्साही झालेल्या युवकांनी धावाधाव सुरू केली खरी; पण काही तासांतच ही जाहिरात लबाड असल्याचे ऐकून त्यांच्या उत्साहावर पाणी पडले. ७ ते २३ जानेवारी या काळात राज्य पोलीस दलात तब्बल १५,४६५ जागांसाठी ऑनलाईन पोलीस होणार असल्याचं यात म्हटलं होतं.
प्रामुख्याने मुंबई ३४00, पुणे १३४२, रायगड २४८, सातारा २१२, सांगली ३५, ठाणे ३६५, ठाणे ग्रामीण १३४, नवी मुंबई ६५0, गडचिरोली १६00, नागपूर ४0३, रत्नागिरी ३१५, हिंगोली २४१, बीड ३१५, एसआरपीएफ २३१ अशी जागांची वर्गवारिही यात दिली गेली होती, पण ही जाहीरात धादांत खोटी असल्याचं पुढच्या काही तासांतच उघड झालं.
वास्तविक पोलीस भरती लवकरच सुरू होणार असं वारंवार राज्य गृह विभागाकडून बोललं जातंय. याबाबत अधिकृतरित्या सरकारी सूत्रांकडून लवकरच माहिती जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. तरी, तरुणांनी अशा भूलथापांना बळी पडू नये, असं आवाहन `झी मीडिया` करत आहे. तरुणांनी कोणतीही जाहिरात पाहिल्यानंतर प्रथम त्याबद्दल खातरजमा करून घ्यावी.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.