www.24taas.com, विकास गावकर, सिंधुदुर्ग
आज राष्ट्रीय सागरी दिन... पाणवनस्पती, रंगीबेरंगी मासे आणि विविध जलचर पाहून तुम्हालाही समुद्र सफर करावीशी वाटेल. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय ही समुद्रखालच्या दुनियेची सफर...
‘कोकणाला सौंदर्य वाटताना निसर्गानं हात जरा जास्तच सैल सोडला... निळाशार अथांग समुद्र, आभाळाशी स्पर्धा करणारी ताडामाडाची झाडं, हिरव्या रंगानं नटलेल्या आमराईनं कोकणची भूमी नटून बसली. हे सगळं कोकणचं वरवरचं सौंदर्य... लाटांवर स्वार होऊन या निळाशार समुद्राच्या पोटात शिरलं तर एक वेगळीच दुनिया तुम्हांला आश्चर्यचकित करुन टाकते. विविध प्रकारच्या पाणवनस्पती, माशांचे प्रकार, वेगवेगळे जलचर या रंगीबेरंगी दुनियेत तरंगत असतात. समुद्रात वाढणाऱ्या या पाणवनस्पतींना सरगॅसम म्हणतात. अवघ्या दोन महिन्यांत या सरगॅसमचं जंगल तयार होतं.
माशांचा एखादा थवाच्या थवा भटकंतीला निघालेला दिसतो. विशेष म्हणजे समुद्रतळाशी असणारे मासे वनस्पतींसारखेच भासतात. पण, या समुद्रछड्या वनस्पती नसून मासे आहेत, यावर विश्वास बसणं खरोखरच कठीण. दगडासारखी आरामात पहुडलेली चारशे ते पाचशे वर्षांची प्रवाळं... ही प्रवाळं समुद्रजिवांना लागणारं कॅल्शियम कार्बोनेट तयार करतात. समुद्रातल्या छोट्या माशांना राहण्यासाठी आणि शत्रूपासून लपण्यासाठी या प्रवाळांचाच आधार होतो. मधूनच एखादा रंगीबेरंगी मासा मिरवत जातो... त्याच्या मोहात पडाल तर सावधान, कारण या माशांचा जेवढा रंग जेवढा गडद तितकेच हे मासे विषारी असतात. समुद्राखालच्या ही दुनियेची सफर खरंच अविस्मरणीय होऊन जाते.
समुद्रातलं हे सहजीवन थक्क करुन टाकणारं... एकदा खरंच वेळ काढा आणि समुद्रातल्या या निळाईची सफर नक्की करा... निळाईचं हे सुखद दर्शन अपूर्वाईची खात्री पटवून जातं.