मुंबई : महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावं, व्यायाम करावा यासाठी कुर्ल्यात फक्त महिलांकरता मोफत व्यायाम शाळा सुरू केलीय. नुकतंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी या व्यायाम शाळेचं उद्धाटन केले.
महिला नेहमीच आपलं घर सांभाळताना आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. तर नोकरी करणा-या महिला आपलं काम करत असताना आपल्या आरोग्याची काळजी घेत नाहीत. त्यातल्या त्यात कुर्ल्यासारख्या मोठ्याप्रमाणात झोपडपट्टी असलेल्या विभागातील महिलांचे तर आरोग्याकडे संपूर्ण दुर्लक्षच होतं. या महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. व्यायाम तसंच योगा करून निरोगी रहावं या हेतून मनसेतर्फे ही मोफत व्यायामशाळा आणि योगा केंद्र उभारण्यात आले आहे.
या व्यायामशाळेत महिलांना व्यायामासाठी आवश्यक सर्व अत्याधुनिक यंत्र सामग्री तसंच महिला प्रशिक्षकही नेमण्यात आलेत. मुंबईच्या विविध ठिकाणी असलेल्या जिममध्ये झोपडपट्टीत राहणा-या महिला आर्थिक चणचणीमुळे प्रवेश घेऊ शकत नाही. मात्र सावित्रीबाई फुले महिलाव्यायाम शाळा ही सर्वच महिलांसाठी मोफत आहे. या जीमसाठी मनसे उपाध्यक्ष दिलीप लांडे यानी पुढाकार घेऊन ती सुरु केली.
झोपडपट्टी विभागात राहत असल्यानं योगा आणि व्यायाम करण्यामुळे महिला या शारीरिक दृष्ट्या फिट राहतीलच. तसंच मानसिक ताणही कमी होणार आहे. आपल्या आरोग्यासाठी महिलांनी एक तास काढणे अत्यंत महत्वाचे आहे. या जिमचा फायदा महिला घेतीलच यात शंका नाही.