www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
आज जागतिक हृदयरोग दिवस. भारतात सुमारे सव्वाकोटी लोकांना हृदयाशी संबंधित आजार आहेत. तसंच यासंदर्भातील सर्वाधिक मृत्यूही भारतात होतायत. त्यामुळं हृदय जपा, मृत्यू टाळा असं म्हणण्याची वेळ आलीय.
बदललेली जीवन शैली, वाढतं प्रदूषण, वाढते ताण-तणाव यामुळं हृदयाशी संबंधित आजार वाढतायत. ‘प्रिवेन्शन इज बेटर दॅन क्युअर’ असं म्हटलं जात असलं तरी हे प्रत्यक्ष आयुष्यात उतरवणं शक्य होत नाही. त्यामुळंच जगभरातील लोकांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण वाढू लागलंय.
जगात होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी ३० टक्के मृत्यू हे हृदयविकारामुळं होतात. तर भारतात हेच प्रमाण ३५ टक्क्याहून जास्त आहे. जगात जवळपास पावणे दोन कोटी लोकांचा मृत्यू हा हृदयविकारामुळं होतो. यामध्ये महिलांची संख्या ८६ लाख असून यातील ३४ टक्के महिला या भारतातल्या आहेत. भारतात १ कोटी २० लाख लोकांना हृदयाशी संबंधित आजार आहेत. म्हणजे जगातील एकूण हृदयविकार रुग्णांपैकी ६० टक्के हे भारतातील आहेत.
बदलत्या जीवनशैलीमुळं भारतात हदयविकाराचं प्रमाण वाढत असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. आहारात अतिचरबीयुक्त पदार्थांचं प्रमाण, स्मोकिंग, तंबाखू, गुटख्याचं सेवन, वातावरणातील प्रदूषण तसंच व्यायामाचा अभाव, वाढते ताण-तणाव यामुळं हृदयाशी संबंधित आजार वाढतायत.
खाण्याच्या पदार्थामध्ये रेड मीठ, बेकरी उत्पादनं, जंक फूड, बर्गर, बटाटा वडा, पावभाजी याचं प्रमाण कमी ठेवणं. मद्य आणि शीतपेय न पिणं, आहारात तेल आणि तुपाचा वापर कमी करणं गरजेचं आहे.
हद्यविकार टाळण्यासाठी आहारात ताजी फळं, भाज्या, मोड आलेली कडधान्यांचा वापर करणं. शेलफिश सोडून इतर मासे याचाही आहारात समावेश करणं, नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. जागतिक हृदयरोग दिनाच्या निमित्तानं सर्वांनी संकल्प करुन आपलं हृदय जपण्याचा प्रयत्न केल्यास हृदयरोगांपासून आपण दूर राहू शकतो.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.