रमेश जोशी, असिस्टंट प्रोड्युसर, झी २४ तास
गुढी पाडवा... हिंदू नववर्षदिन.... पाडव्याला अनन्य साधारण असं महत्व आहे.. जसा गाव तशा चालीरीती... अगदी मैलामैलांवर गावातील चालीरिती बदलतात.... मुंबईच्या वेशीवर असलेलं माझं गावही याला अपवाद नाही. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील माथेरानच्या डोंगर रांगाच्या अगदी विरुद्ध दिशेला माझं गाव... पोशीर... साधारण आठशे उंब-यांचं हे गाव.... प्रत्येक गावात साजरा करतात तसाच गुढी पाडवा साजरा केला जातो.... जसा काळ बदलला तशा चालीरीती बदलत गेल्या. आमच्या गावातील गुढी पाडवाही बदलला पण त्यावेळीच्या पाडव्याच्या आठवणी आजही मनात ताज्या आहेत...
गावात बहुतांश आगरी समाजाची लोकवस्ती... आग-यांसाठी गुढी पाडवा खासच असायचा.... पाडव्याची तयारी आदल्या दिवसापासून सुरू व्हायची... आदल्या दिवशी सूर्य मावळतीला लागला की, आग-यांच्या घरात धावपळ सुरू व्हायची... कोयत्याला निसण्याच्या दगडावर धार लावण्याचा आवाज घरोघरी यायचा... मग गावाच्या बाहेरच्या बाजूला बांबूच्या बेटात लोकांची एकच गर्दी व्हायची... ज्याच्या मालकीचं बाबूंचं बेट असायचं. तेथे सर्वात उंच बांबूची काठी हेरायचा.... आणि मग ती बांबूची काठी तोडायची... तोडलेली काठी कोयत्यानं साफ करुन घ्यायची... गावात ज्याच्या मालकीचं बांबूचं बेट नाही त्यालापण काठी मिळायची.
काठी घेतल्यानंतर सगळ्यांचा मोर्चा तळ्याकडे वळायचा... तळ्यावर बांबूंच्या काठ्यांना आंघोळ व्हायची... घरातल्या वडीलधा-या मंडळीसोबत आमची बच्चे कंपनीची गँगही असायची.... मुलांचीही घाईगडबडच असायची... गुढी पाडव्याच्या दिवशी शाळेत सरस्वती पूजन असायचं... दगडाची पाटी असायची.... प्लॅस्टिकच्या पाट्या क्वचितच दिसायच्या. श्रीमंताच्या मुलांजवळ तशा पाट्या असायच्या... आमच्याजवळ दगडाच्या पाट्या होत्या.. त्या पाट्यांना कोळसा घासून काळ्या कुळकुळीत करत असायचो... त्या नादात हात आणि कपडे काळे व्हायचे, पण पाटीची पूजा असायची... अशिक्षित आगऱ्यांना मुलगा पाटी पुजतोय याचेच कौतुक असायचं.... आमच्यापेक्षा मोठे असणा-या मुलांकडे किंवा गावातल्या मास्तरांकडे पाटी घेऊन आम्ही ऐटीतच निघायचो... पाटीवर सरस्वती काढली की तू फुलाप्रमाणं जपून घरी आणायची... कोणालाही हात लावू द्यायचा नाही... गुढी पाडव्याच्या दिवशी पाहाटेच उठायचं... गावात ज्या ठिकाणी तगरीची फुलं मिळतात, अशा ठिकाणी मोर्चा वळवायचा... पाटी सजवायची... मोर्चा शाळेत... शाळेत तुफान किलबिलाट असायचा... पाटीसोबत आई एका रुमालात तांदूळ बांधून द्यायची... तांदूळ बांधलेल्या रुमालात एक चार आण्याचं नाणं दिलं जायचं... शाळेत गुरुजींच्या नेतृत्वाखाली सामूहिक सरस्वती पूजन व्हायचं... गुरुजींच्या पाया पडण्यासाठी मुलांची झुंबड उडायची... रुमालात बांधलेले मुठभर तांदूळ आणि चार आण्याचं नाणं... हीच आमच्या गुरुजींची दक्षिणा... आता गुरुजींचे सर झाले, पाठोपाठ तो मानसन्मानही कमी झाला. तर हे झालं शाळेचं...
घरी आईवडील मुलांची वाट पाहात बसायचे.... आई सकाळीच अंगण शेणानं सारवून काढायची... रांगोळी काढायची... गुढी उभारण्यासाठी पाट... गुळाचा एक खडा... काठी पाटावर ठेवण्यासाठी टॉवेल... पितळेचा तांब्या.... बाबांची अगोदरच तयारी असायची... गंधगोळी कालवून पूजा सुरु व्हायची...कुणाची गुढी उंच आहे हे सांगण्याची मुलांमध्ये अहमिका लागायची... गावातल्या सगळ्या तरुण आणि प्रोढांमध्ये उत्सुकता असायची पूजन पूर्ण होण्याची... कारण पाडव्याचा दिवस खास असायचा... पाडव्याच्या दिवशी पूर्ण गाव जंगलात शिकारीला निघायचं... गावात पाटलाच्या घरी बंदूक असायची... पाटील बंदूक घेऊन पुढं निघायचा... खांद्यावर बंदूक घेतलेल्या पाटलाचा रुबाब पाहण्यासारखा असायचा... पाटलाच्या मागं चारपाचशे लोकांचा लोंढा असायचा.... काही लोकांच्या हातात सापळे असाय़चे... पाटील आणि जाणती मंडळी जंगलातल्या एका मोठ्या झाड़ाखाली बसून शिकारीची योजना आखत... कुणी कुठं सापळे लावायचे... हाकाऱ्यांनी कसं जंगल पिंजून काढायचं... जनावरं नेमक्या कोणत्या रस्त्यावरुन येतील याचे आडाखे बांधले जायचे... पाटलाची बंदूक तैनात व्हायची... सापळे लावले जायचे... जंगलातील डोंगर पिंजून काढले जायचे... बंदुकीचा ठो आवाज आला की समजायचं रान डुक्कर पडलं... शिट्ट्यांचा आवाज आला की समजायचं ससा सापळ्यात अडकला.... दिवसभर शिकार चालायची... दुपारी कधीतरी रानातल्या विहिरीवर घरुन बांधून आणलेली भाकरी खायची... संध्याकाळच्या वेळेला... शिकारीत मिळालेल्या २० त