Supari Benefits : सुपारी.... ही लहानशी सुपारी, जी मोठ्या सामानामध्ये अनेकदा दृष्टीसही पडत नाही ती किती फायद्याची आहे तुम्हाला माहितीये? म्हणजे मुखवासामध्ये सुपारीचा वापर होण्यापलीकडे ती पुजाविधीमध्ये वापरली जाते इतकीच आपल्याला तिच्याविषयी असणारी माहिती. पण, त्यापलीकडे जाऊन तिचे काही थक्क करणारे गुणही आहेत ज्याविषयी जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. ज्योतिषविद्येमध्ये (Astrology) सुपारीचे (Supari) असे काही गुण सांगण्यात आले आहेत, जे आपल्या आयुष्यालाच कलाटणी देऊ शकता. तुम्हाला माहितीये का, सुपारीची गणपती, गौरी, कुळदेवता, ग्रामदेवता म्हणूनही पूजा केली जाते.
एखाद्या व्यवसायात फायदा मिळवण्यासाठी, अडकलेली कामं मार्गी लावण्यासाठी, लग्न- नाती सुरळीत सुरु ठेवण्यासाठी सुपारीचा वापर होतो. हीच सुपारी तुम्हाला लक्ष्मीचा वरदहस्त मिळवण्यासाठीसुद्धा मदत करेल. त्यासाठी काय करावं? पाहा...
- कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या कामांमध्ये अडचणी येत आहेत, तर गणपतीपुढे (Ganesha Puja) सुपारी आणि लवंग अर्पण करा. जेव्हा केव्हा एखाद्या कामासाठी बाहेर पडत असाल, तर हीच सुपारी आणि लवंग सोबत न्या. असं केल्यास घरातून निघताना संकल्प केलेलं काम नक्की पूर्ण होईल.
- कोणत्याही दिवशी सकाळी स्नानानंतर गणपतीपुढे पानाचा विडा मांडा त्यावर तांदुळ, कुंकू आणि तूपानं एक स्वस्तिक काढा आणि त्यावर सुपारी बांधून ते गणपतीला वाहा. आता ही पुरचुंडी तिजोरी किंवा तुम्ही धन ठेवता त्या ठिकाणी ठेवा. असं केल्यानं आर्थिक चणचण दूर होते.
- कोणत्याही शनिवारी (Saturday) पिंपळाच्या झाडाखाली सुपारी आणि एक रुपयाचं नाणं ठेवा आणि दुसऱ्या दिवशी त्या पिंपळाची पूजा करा आणि एका पानात ती सुपारी आणि नाणं गुंडाळून ते तिजोरीत ठेवा. असं केल्यास धनलाभ आणि आर्थिक वृद्धी होते.
- सुपारी शुक्रवारी लक्ष्मीला अर्पण करून तिची उपासना करा. एका सुपारीवर लाल रंगाचा धागा गुंडाळून ती तिजोरीत ठेवा. असं केल्यासही लक्ष्मीचा वरदहस्त सदैव तुमच्यावर राहील.
(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भ आणि धारणांवर आधारित आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)