Jawagal Srinath, ICC Match Refree : आशिया चषक स्पर्धेतील (Asia Cup) पाचवा सामना भारत आणि नेपाळ (India vs Nepal) यांच्यात खेळवला जात आहे. टीम इंडियाचा हा दुसरा सामना असणार आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडिया पाकिस्तानला भिडली होती. हा सामना पावसामुळे धुवून निघाला. आता भारत आणि नेपाळ यांच्यातील सामना टीम इंडियासाठी महत्त्वाचा असणार आहे. अशातच आता या सामन्यात 20 वर्षापूर्वी निवृत्ती घेतलेल्या एका भारतीय खेळाडूने इतिहास रचला आहे.
माजी वेगवान गोलंदाज आणि मॅच रेफरीची भूमिका बजावणाऱ्या जवागल श्रीनाथ याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. सामनाधिकारी म्हणजेच मॅच रेफरी म्हणून 250 व्या सामन्यात जवागल श्रीनाथ आपली भूमिका बजावणार आहे. श्रीनाथ मदुगले, ख्रिस ब्रॉड आणि जेफ क्रो याच्यानंतर 250 सामन्यात मॅच रेफरीची भूमिका बजावणारा चौथा आयसीसी सामनाधिकारी असेल. 2006 पासून त्यांनी सामनाधिकारी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. नेपाळ विरुद्ध भारत हा 250 वा सामना असणार आहे.
एक सामनाधिकारी म्हणून इतका मोठा पल्ला गाठणं चांगलं वाटतं. मला हे काम करताना 17 वर्षे पूर्ण झाली आहे. मला विश्वास बसत नाही की, मी आतापर्यंत इतके वनडे सामने खेळलो त्यापेक्षा अधिक वनडेसाठी मी सामनाधिकारीची भूमिका बजावली आहे, असं श्रीनाथ म्हणतात. 17 वर्षापूर्वी मी कोलंबोत श्रीलंका विरुद्ध दक्षिण अफ्रिका कसोटी सामन्यात सामनाधिकारी म्हणून पहिल्यांदा भूमिका बजावली होती. आतापर्यंतचा प्रवास खरंच खूप छान होता, असं म्हणत श्रीनाथ यांनी आनंद व्यक्त केलाय.
निवृत्तीनंतर देखील मला क्रिकेटसोबत राहण्याचं सौभाग्य लाभलं. मी येत्या वर्षात आणखी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन, असंही श्रीनाथ यांनी म्हटलं आहे. 250 सामन्यात मोलाची कामगिरी केल्यानंतर त्यांना आभाळ ठेंगणं झाल्याचं दिसत होतं.
दरम्यान, जवागल श्रीनाथ यांनी 65 कसोटी सामने, 118 मेन्स टी-20 आंतरराष्ट्रीय सामने आणि 16 वुमेन्स टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सामनाधिकाऱ्याची भूमिका बजावली होती. टीम इंडियाकडून खेळताना श्रीनाथ यांनी 67 कसोटी सामन्यात 236 विकेट्स आणि 219 वनडे सामन्यात 315 विकेट्स घेतल्या होत्या.