केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटीतील तिसरा दिवस पावसाने धुऊन काढला. न्यूलँडच्या मैदानावर तिसऱ्या दिवशी पाऊस झाल्याने खेळ होऊ शकला नाही.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, आज पाऊस होण्याची शक्यता नाही. सामन्यातील दोन दिवसांचा खेळ बाकी आहे. दोन दिवसांचा खेळ झाल्यास सामन्याचा निकाल हाती येण्याची शक्यता आहे.
यातच भारतीय संघाच्या विजयाची आशा अजूनही कायम आहे. भारतीय संघातील क्रिकेटर चेतेश्वर पुजाराच्या मते ३५० धावांचे लक्ष्य मिळाले तर भारताला विजयाच्या संधी आहेत. पुजाराच्या मते टीम इंडिया ३५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्याची क्षमता आहे.
पहिल्या सामन्यात तिसऱ्या दिवसअखेर आफ्रिकेकडे १४२ धावांची आघाडी आहे. द. आफ्रिकाने पहिल्या डावात २८६ धावा केल्या. त्यानंतर भारतीय संघाचा पहिला डाव २०९ धावांत आटोपला. द. आफ्रिकेने दुसऱ्या दिवसअखेर दोन विकेटच्या मोबदल्यात ६५ धावा केल्या.
तिसऱ्या दिवसअखेर आफ्रिकेकडे १४२ धावांची आघाडी असली तरी दुसऱ्या डावात भारतीय संघ चांगली कामगिरी करेल अशा विश्वास पुजाराने व्यक्त केलाय. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पुजारा म्हणाला, आम्हाला जास्त धावांचा पाठलाग करायचा नाहीये. मात्र विकेट्स पाहता आम्हाला वाटते आम्ही ३५० धावांच्या आव्हानांचा पाठलाग करु शकतो. पहिल्या डावात टॉप फळीतील फलंदाजांची कामगिरी सुमार झाली मात्र दुसऱ्या डावात आम्ही चांगला खेळ करु.
दक्षिण आफ्रिकेच्या न्यूलँडस मैदानावर भारताचे इतर फलंदाज अपयशी होत असताना ऑलराऊंडर क्रिकेटर हार्दिक पांड्याने दमदार ९३ धावांची जबरदस्त खेळी केली. दुसऱ्या दिवशी आफ्रिकेचे दोन बळी मिळवत त्याने ९३ धावांची खेळी करत संघाला २०९ धावांचा टप्पा गाठून दिला.