लंडन : कोरोनामुळे जगातली सर्वात जुनी आणि प्रतिष्ठीत असलेली विम्बल्डन टेनिस स्पर्धा यावर्षी रद्द होण्याची शक्यता आहे. येत्या बुधवारी याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
दरवर्षी होणाऱ्या चार ग्रँण्ड स्लॅम स्पर्धांपैकी विम्बल्डन ही सर्वात प्रतिष्ठीत स्पर्धा मानली जाते. लंडनमध्ये ग्रास कोर्टवर खेळवली जाणारी ही स्पर्धा यावर्षी २९ जून ते १२ जुलै दरम्यान खेळवली जाणार होती. पण कोरोनाच्या संकटामुळे ती रद्द केली जाण्याची घोषणा विम्बल्डनचे आयोजक करतील, अशी माहिती जर्मन टेनिस फेडरेशनचे उपाध्यक्ष डिर्क हॉर्डोर्फ यांनी स्काय स्पोर्ट्सला दिली आहे.
येत्या बुधवारी विम्बल्डन आयोजकांची बोर्ड मीटिंग आहे आणि त्यावेळी ते अंतिम निर्णय घेतील, असं हॉर्डोफ यांनी म्हटलंय. विम्बल्डन रद्द करण्याचं जवळजवळ नक्की झालंय आणि बुधवारच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होईल. सध्याच्या परिस्थितीत तसंच करणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले.
सध्या प्रवासावर असलेले निर्बंध पाहता विम्बल्डनसारखी मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा होऊ शकेल याचा विचारही होऊ शकत नाही, असं ते म्हणाले. हॉर्डोफ यांनी ही माहिती दिली असली तरी स्पर्धा रद्द करण्याच्या शक्यतेबाबत विम्बल्डन आयोजकांनी मात्र अधिकृतपणे भाष्य केलेलं नाही.
टोकयो ऑलिम्पिक पुढे ढकलण्याचा निर्णय झाला असला तरी विम्बल्डनबाबत मात्र असा निर्णय घेणं शक्य नाही. कारण विम्बल्डनसाठी दोनच बंदिस्त कोर्ट आहेत आणि ती नंतर खेळवणं शक्य नाही.
फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या आयोजकांनी स्पर्धा मे ऐवजी सप्टेंबरमध्ये घेण्याचा एकतर्फी निर्णय जाहीर केल्यानं त्यांना टेनिस जगताच्या टीकेला सामोरं जावं लागत आहे. कारण अनेक स्पर्धा त्याचवेळी असल्यानं आयोजकांच्या एकतर्फी निर्णयावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.