Cricketers Batsman Flag Rules: वर्ल्डकपमध्ये आज भारतीय संघासमोर इंग्लंड संघाचं आव्हान आहे. भारतीय संघाने आतापर्यंत झालेल्या पाचही सामन्यात विजय मिळवला आहे. आज लखनऊमध्ये इंग्लंड आणि भारत आमने सामने येणार आहेत. वर्ल्डकप सुरू असतानाच सध्या एक प्रश्न चर्चेत आहे. सामना सुरू असताना जेव्हा खेळाडू फलंदाजीसाठी उतरतात तेव्हा हेल्मेटदेखील घालतात. अनेक भारतीय खेळाडूंच्या हेल्मेटवर भारतीय तिरंगा लावल्याचे तुम्ही पाहिलं असेल. अनेकदा हेल्मेटवर लावलेल्या भारतीय तिरंगावरुन वाद निर्माण झाले आहेत. अशावेळी हेल्मेटवर तिरंगा लावणे योग्य की अयोग्य, नियम काय व ध्वजसंहिता काय सांगते, हे सविस्तर जाणून घेऊया.
हेल्मेटवर तिरंगा लावण्याबाबत याआधीही अनेक चर्चा रंगल्या होत्या. हेल्मेटवर देशाचा झेंडा लावण्याने तिरंग्याचा अपमान होतो, असं अनेकांचं म्हणणं होतं तर, काही जण खेळाडूंच्या देशप्रेम आहे, असं म्हणत होते. तर, काही वर्षांपूर्वी खेळांडूना असं करण्यास विरोध करण्यात आला होता. ध्वजसंहिता काय सांगते आणि याबाबत काय वाद झालेत. हे जाणून घेऊया.
2005 साली खेळाडूंना तिरंग्याचा वापर करण्यावर बंदी घातली होती. खेळाडू ज्या साहित्यांचा वापर करतात त्यावर तिरंगा न लावण्यास सांगितले होते. 2005 साली बीसीसीआय आणि भारत सरकारमध्ये यावरुन वाद झाला होता. त्यानंतर भारतीय खेळाडूंना त्यांच्या हेल्मेट, रिस्ट बँड किंवा जर्सीवर कुठेही तिरंगा दाखवण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी गृह मंत्रालयाने भारतीय ध्वज संहितेचा हवाला देत जर्सी किंवा किटवर तिरंग्याचा वापर करू नये, असे सांगितले होते.
इंडिया टुडेच्या एका रिपोर्टनुसार, सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनीही त्यांच्या हेल्मेटवरून तिरंगा काढून टाकला. त्यानंतर यावर बराच गदारोळ झाल्यानंतर बीसीसीआयने सरकारशी चर्चा केली आणि तत्कालीन गृहमंत्री शिवराज पाटील यांनी तिरंगा वापरण्यास पुन्हा परवानगी दिली. यानंतर हेल्मेट इत्यादींवर पुन्हा तिरंग्याचा वापर सुरू झाला.
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 2011 च्या विश्वचषकानंतर हेल्मेटवर तिरंगा लावणे बंद केले होते. त्यामागचे कारण असे सांगितले जात होते की, धोनी विकेटकिपिंग करताना हेल्मेट जमिनीवर ठेवायचा, त्यामुळे त्याने तिरंग्याचा अपमान होऊ नये, म्हणून धोनीने हेल्मेटवर तिरंगा लावणे बंद केले होते.