गोल्ड कोस्ट : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारतीय संघाने शानदार खेळ करत मलेशियाला हरवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. याआधी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मुकाबला बरोबरीत सुटल्याने भारताला झटका जरुर बसला होता मात्र वेल्सला हरवत भारताने शानदार पुनरागमन केले. मंगळवारी मलेशियाविरुद्धचा सामना जिंकत भारताने सेमीफायनल प्रवेश केला.
भारताने गोल्ड कोस्ट हॉकी स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या मलेशियाला २-१ने हरवले. भारतसाठी हरमनप्रीतने तिसऱ्या आणि ४४व्या मिनिटात गोल केला. तर मलेशियाकडून फैजल सारीने १६व्या मिनिटावा गोल केला. हरमनप्रीतने दोन पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर केले.
भारताने सामन्याची सुरुवात दमदार केली आणि तिसऱ्याच मिनिटात आघाडी घेतली. तिसऱ्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत हरमनप्रीतने गोल केला आणि भारताला १-० अशी आघाडी मिळाली. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताने ही आघाडी कायम राखली.
दुसऱ्या क्वार्टरमध्ये मलेशियाने बरोबरी साधण्यात यश मिळवले. मलेशियासाठी फैजल सारीने गोल केला. त्यानंतर पुढच्याच मिनिटात भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला मात्र त्याचे गोलमध्ये रुपांतर करण्यात अपयश मिळाले. दुसऱ्या क्वार्टरच्या अखेरपर्यंत १-१ अशी बरोबरी कायम होती. तिसऱ्या क्वार्टरच्या अखेरीस भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. हरमनप्रीतने याचा फायदा घेत गोल करत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.
FT. The Indian Men's Hockey Team seal a spot in the Semi-Finals of the men's hockey event at the @GC2018 Commonwealth Games with a steely show against Malaysia in their third game of the competition on 10th April.#IndiaKaGame #HallaHockeyKa #GC2018 #INDvMAS pic.twitter.com/GAE3kihB75
— Hockey India (@TheHockeyIndia) April 10, 2018
वेल्सला ४-३ ने दिली मात
याआधीच्या सामन्यात भारताने वेल्सला ४-३ अशी मात दिली. एका वेळेस सामना बरोबरीत सुटेल की काय असे वाटत होते मात्र ५८व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर एस व्ही सुनीलने गोल करत भारताला विजय मिळवून दिला.