मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने त्याच्या मनातली खंत बोलून दाखवली आहे. विराट कोहली आणि एमएस धोनीपेक्षा सौरव गांगुलीने कर्णधार असताना मला जास्त पाठिंबा दिला, असं युवराज म्हणाला आहे. स्पोर्ट्स स्टारला दिलेल्या मुलाखतीत युवीने हे सांगितलं आहे.
'मी पहिले सौरव गांगुली आणि मग धोनीच्या नेतृत्वात खेळलो. गांगुली आणि धोनी यांच्यात निवड करणं कठीण आहे. गांगुलीने भरपूर पाठिंबा दिल्यामुळे त्याच्याबद्दल बऱ्याच आठवणी आहेत. माही आणि कोहलीने तसा पाठिंबा दिला नाही,' असं युवराज म्हणाला.
२०११ सालचा वर्ल्ड कप भारताला जिंकवण्यात युवराजने महत्त्वाची भूमिका बजावली होती. २०११ वर्ल्ड कपमध्ये युवराज मॅन ऑफ द टुर्नामेंट होता. जून २०१९ साली युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. २००७ सालच्या टी-२० वर्ल्ड कपमध्येही युवराजने मोलाची कामगिरी केली. पहिल्यांदाच झालेल्या या टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताचा विजय झाला होता.
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रसारामुळे युवराज सिंग इतर अनेक क्रिकेटपटूंप्रमाणे घरातच आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना २१ दिवस घरी राहण्याचं आवाहन केलं. युवराजनेदेखील इतर सेलिब्रिटींप्रमाणेच त्यांच्या चाहत्यांना घरात बसण्याचा सल्ला दिला आहे.