मुंबई : २०१८ साली होणाऱ्या आशिया कपच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. पण या वेळापत्रकावरून आशियाई क्रिकेट परिषदेवर जोरदार टीका होत आहे. १५ सप्टेंबरपासून आशिया कपला सुरुवात होणार आहे. पण भारताचे सामने १८ आणि १९ सप्टेंबर अशा लागोपाठ दोन दिवस ठेवण्यात आले आहेत. १९ सप्टेंबरला भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. पण लागोपाठ दोन दिवस वनडे सामने खेळले तर भारताला विश्रांती मिळणार नाही. या वेळापत्रकावरून आता भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनं टीका केली आहे. भारतानं आशिया कपमधून माघार घ्यावी असा सल्ला सेहवागनं दिला आहे.
इंग्लंड दौऱ्यामध्ये दोन टी-२०मध्ये दोन दिवसांची विश्रांती देण्यात आली. मग आशिया कपमध्ये लागोपाठ दोन दिवस भारताचे सामने कसे ठेवण्यात आले. कोणती टीम लागोपाठ दोन वनडे खेळतो का? पाकिस्तानविरुद्धच्या मॅचवेळी भारतीय खेळाडू थकतील. यामुळे पाकिस्तानच्या टीमला फायदा होईल. अशा स्पर्धांमध्ये भाग घेण्याऐवजी भारतानं पुढच्या सीरिजची तयारी करावी. हे वेळापत्रक चुकीचं असल्याचं सेहवाग म्हणाला.
अशाप्रकारे लागोपाठ दोन दिवस वनडे खेळून एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर त्या दुखापतीमधून सावरणं खेळाडूला कठीण जाईल, अशी भीती सेहवागनं व्यक्त केली.
आशियाई क्रिकेट परिषदेवर बीसीसीआयनंही टीका केली आहे. स्पर्धेचं आयोजन करताना आशियाई क्रिकेट परिषदेनं डोकं वापरलंय का असा बोचरा सवाल बीसीसीआयनं केला आहे. पहिली मॅच झाल्यानंतर विश्रांतीसाठी एकही दिवस नसताना दुसऱ्या दिवशी पाकिस्तानविरुद्धची मॅच का ठेवण्यात आली. या वेळापत्रकामध्ये बदल करण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया बीसीसीआयनं दिली आहे.
भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि आशिया कप क्वालिफायर जिंकणारा देश अशा ६ टीम आशिया कपमध्ये सहभागी होतील. या ६ टीमचे दोन ग्रुप करण्यात आले आहेत. भारत, पाकिस्तान आणि क्वालिफायर जिंकणारा देश ग्रुप ए मध्ये आणि बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान ग्रुप बी मध्ये आहेत.
प्रत्येक ग्रुपमधील २-२ टीम अशा एकूण ४ टीम सुपर ४ मध्ये जातील. सुपर-४ मध्ये प्रत्येक टीम एकमेकांविरुद्ध खेळेल आणि सुपर-४ मधल्या टॉप २ टीम फायनलमध्ये खेळतील. २८ सप्टेंबरला आशिया कपची फायनल खेळवण्यात येईल.
आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान कमीत कमी दोनवेळा एकमेकांविरुद्ध खेळतील असं या वेळापत्रकावरून दिसत आहे. १९ सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तानमध्ये ग्रुप स्टेजमधला सामना होईल. यानंतर सुपर-४मध्येही या दोन्ही टीम एकमेकांना भिडतील याची दाट शक्यता आहे. अबु धाबी आणि दुबई या दोन ठिकाणी आशिया कपचे सामने होणार आहेत. १५ सप्टेंबर ते २८ सप्टेंबरपर्यंत आशिया कप होणार आहे.
भारत आणि पाकिस्तानमधल्या ताणल्या गेलेल्या संबंधामुळे या दोन्ही देशांमध्ये फक्त आयसीसीच्या स्पर्धांवेळीच सामने होतात. आशिया कपनंतर वर्ल्ड कपमध्येही भारत-पाकिस्तानचा सामना होणार आहे. २०१९ सालच्या वर्ल्ड कपमध्ये १६ जूनला भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. २०१९ चा वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये खेळवण्यात येणार आहे.
१८ सप्टेंबर- भारत विरुद्ध आशिया कप क्वालिफायर देश
१९ सप्टेंबर- भारत विरुद्ध पाकिस्तान