दुबई : एलिमिनेटर सामन्यात बंगळुरूवर कोलकाताने चार गडी राखून विजय मिळवल्यानतंर आयपीएल 2021 मधील RCB चा प्रवास संपला आहे. कोलकाताविरुद्धच्या सामन्यादरम्यान विराट कोहलीने आयपीएलमध्ये शेवटच्या वेळी कर्णधाराची भूमिका बजावली. सामन्यानंतर विराट कोहलीने संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये भावनिक संदेश दिला.
विराट कोहली 2011 मध्ये पहिल्यांदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार झाला. या फ्रँचायझीकडून खेळून त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र, त्याला कधीही बंगळुरूला आयपीएलचे जेतेपद मिळवता आले नाही.
विराट कोहली सोमवारी रात्री संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये म्हणाला, “जर तुम्ही मला विचारले तर 2016 चा हंगाम खूप खास होता. मला वाटते हा सध्याचा हंगाम सर्वात मजेदार राहिला. ज्या प्रकारे आपण स्वतःला पुढे नेलं. ज्या पद्धतीने आपण विजय आणि पराभव हाताळलं, मला वाटते की हे खूप खास होतं.'
विराट कोहली पुढे म्हणाला, “हे काम पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी खूप मेहनत घेतली आहे. हे सर्व साध्य करण्यासाठी आपण सर्वांनी योगदान दिले. आज आपण थोडे निराश आहोत. परंतु कोणीही तुटलेले दिसत नाही. आज आपण सर्वांना सामना गमावल्याचे दुःख वाटतेय पण आपण ज्या पद्धतीने खेळलो त्याचा अभिमान ही वाटतो. या फ्रँचायझीसाठी खेळताना आपण हेच करण्याचा प्रयत्न केला आहे.'
कर्णधारपद सोडण्याची घोषणा
विराट म्हणाला, “मी या फ्रँचायझीसाठी माझी सर्वोत्तम कामगिरी देण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यातही मी हे चालू ठेवणार आहे. मी या गटात लीडर म्हणून राहिलंच. पण सर्व निर्णय घेणारा लीडर म्हणून नाही.
'ही मोहीम अविस्मरणीय बनवल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो. मला खरोखर वाटते की आम्ही येथे मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण केले आहे. ही अशी गोष्ट नाही जी नंतर संपेल."