मुंबई : इंग्लंडची (England) स्टार वेगवान गोलंदाज अन्या श्रुबसोलेने (Anya Shrubsole) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. ती तिच्या भेदक बॉलिंगसाठी प्रसिद्ध होती. अन्याने अनेकदा इंग्लंडला अनेक सामने एकहाती जिंकून दिले होते. अन्याने तिन्ही फॉर्मेटमध्ये इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं होतं. (england star pacer anya shrubsole retires from international cricket)
"14 वर्षे माझ्या देशाचं प्रतिनिधित्व करणं माझ्यासाठी सन्मानजनक बाब आहे. आपल्या संघाच्या वाढीच्या काळात महिला क्रिकेटमध्ये सहभागी होणे ही सन्मानाची गोष्ट आहे. मात्र क्रिकेटमध्ये वेगाने बदल होत आहेत. त्यामुळे क्रिकेटपासून दूर जाण्याची वेळ आली आहे", असं अन्या म्हणाली.
"मी कधी स्वप्नात ही विचार केला नव्हता की मी इतकी भाग्यवान ठरेन आणि इंग्लंडसाठी इतक्या वेळ खेळेन. क्रिकेटच्या या प्रवासात अनेक चढ-उतार आले. मात्र 2017 मध्ये वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावल्यानंतर सर्वच सार्थकी लागलं", असंही अन्या म्हणाली.
अन्याने टीम इंडिया विरुद्ध 2017 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये शानदार कामगिरी केली होती. अन्याने या सामन्यात 46 धावा देत 5 विकेट्स घेतल्या होत्या. विशेष म्हणजे अन्याची ही तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली होती. तसेच अन्या 2009 च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाची सदस्य होती.
अन्याने आपल्या 14 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत 8 कसोटी, 86 वनडे आणि 79 टी 20 सामन्यात अनुक्रमे 19, 106 आणि 102 विकेट्स घेतल्या आहेत.