भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आकाश चोप्राने पाकिस्तान क्रिकेट संघाची खिल्ली उडवली आहे. खराब गोलंदाजी तसंच गचाळ क्षेत्ररक्षण यामुळे ऑस्ट्रेलिया संघाने पाकिस्तानसमोर धावांचा डोंगर उभा केला आहे. पाकिस्तानला विजयासाठी 368 धावांची गरज आहे. ऑस्ट्रेलियाचे आघाडीचे फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि मिशेल मार्श यांनी शतकं ठोकत पहिल्या विकेटसाठी 259 धावांची भागीदारी केली. डेव्हिड वॉर्नरचा सोपा झेल सोडणं पाकिस्तानला चांगलंच महागात पडलं. यानंतर आकाश चोप्राने पाकिस्तानला ट्रोल करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. कोणीतरी मैदानात डीजेला सांगून दिल दिल पाकिस्तान गाणं वाजवा असा टोला त्याने लगावला आहे.
बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानात ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघ भिडला. यावेळी प्रथम गोलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानची ऑस्ट्रेलियाने चांगलीच धुलाई केली. डेव्हिड वॉर्नर आणि मिशेलने तुफन फटकेबाजी करताना पाकिस्तानी गोलंदाजांची पिसं काढली. डेव्हिड वॉर्नर फक्त 10 धावांवर असताना शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर उसामाने सोपा झेल सोडला होता. हा झेल सोडणं संघाला फारच महागात पडलं. यानंतर आकाश चोप्राने एक्सवर पोस्ट शेअर करत पाकिस्तान संघाची खिल्ली उडवली. "चिन्नास्वामी मैदानात कोणीतरी डीजेला सांगून 'दिल दिल पाकिस्तान' गाणं वाजवा".
Koi DJ ko keh kar ‘Dil Dil Pakistan’ bajwa do at The Chinnaswamy. Pakistan desperately needs a wicket. It’s a flat track alright but this is fast moving towards 375+ score. #CWC23 #PakvAus
— Aakash Chopra (@cricketaakash) October 20, 2023
आकाश चोप्राने ही पोस्ट सामना सुरु असताना केली होती. त्यावेळी पाकिस्तानला एकही विकेट मिळाली नव्हती. आकाश चोप्राने ऑस्ट्रेलिया 375 पेक्षा जास्त धावा करेल असं भाकीत वर्तवलं होतं. पण पहिल्या विकेटनंतर ऑस्ट्रेलिया चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला. 259 वर पहिली विकेट गेल्यानंतर ऑस्ट्रेलिया फक्त 368 धावांपर्यंत मजल मारु शकला. एका क्षणी ऑस्ट्रेलिया संघ 400 धावा करेल असं चित्र दिसत होतं.
आकाश चोप्राच्या 'दिल दिल पाकिस्तान' पोस्टमागे पाकिस्तान क्रिकेट संघाचे संचालक मिकी आर्थर यांच्या विधानाचा संदर्भ आहे. भारताने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर मिकी आर्थर यांनी मैदानात एकदाही 'दिल दिल पाकिस्तान' ऐकायला मिळालं नाहीत सांगत पराभवाचं खापर फोडलं होतं.
"हे पाहा, खरं सांगायचं तर आजचा सामना हा अजिबात आयसीसीने आयोजित केलेला वाटला नाही. मी खोटं सांगणार नाही. ही द्विपक्षीय मालिका वाटत होती. बीसीसीआयने याचं आयोजन केल्यासारखं वाटत होतं. मला मायक्रोफोनवरुन एकदाही 'दिल दिल पाकिस्तान' ऐकायला मिळालं नाही," असं मिकी आर्थर म्हणाले होते.
"या गोष्टी नक्कीच फरक पाडतात. पण मी हे पराभवाचं कारण म्हणून वापरणार नाही. हा प्रश्न तो क्षण जगण्याचा, पुढील चेंडूचा आणि तुम्ही भारतीय संघ, भारतीय खेळाडूंना कसे सामोरे जाता याचा होता," असं मिकी आर्थर यांनी सांगितलं होतं.