ODI World Cup: एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकपच्या (World Cup) टाइम टेबलची आज घोषणा करण्यात आली असून, यामुळे तीन महिने आधीच क्रिकेट रसिकांमध्ये उत्साह संचारला आहे. दरम्यान, क्रिकेट वर्ल्डकप सुरु होण्याआधी भारतीय क्रिकेट संघासमोर दोन आव्हानं आहेत. पुढील महिन्यात भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर (West Indies Tour) जाणार असून, त्यानंतर सप्टेंबर महिन्यात आशिया कप (Asia Cup) होणार आहे. यामुळे भारतीय संघाकडे वर्ल्डकपआधी तालीम म्हणून हे सामने खेळता येतील. वेस्ट इंडिज दौऱ्यात भारतीय संघ तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. दरम्यान, त्याआधी माजी क्रिकेटर आणि समालोचक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी भारतीय फलंदाजातील काही त्रुटी समोर आणल्या आहेत. त्यांनी भारतीय संघाची 2011 मधील वर्ल्डकप विजेत्या संघाशी तुलना केली आहे.
'द वीक' ला दिलेल्या मुलाखतीत रवी शास्त्री यांना जर रोहित शर्मा आणि शुभमन गिल जोडीच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यास समीकरण कसं असेल अशी विचारणा करण्यात आली. रवी शास्त्री यांनी यावेळी भारतीय फलंदाजीत नेमकं काय चुकतंय हे सांगितलं. भारतीय फलंदाजांच्या यादीत डावखुरे फलंदाज फार कमी असल्याचं त्यांनी लक्षात आणून दिलं. ऋषभ पंतचा पर्याय संघाकडे होता, पण डिसेंबर महिन्यात झालेल्या अपघातामुले त्याला वर्ल्डकप संघात स्थान मिळू शकलं नाही. रवी शास्त्री यांनी सांगितलं आहे की, भारताच्या पहिल्या सहा फलंदाजांमध्ये किमान 2 डावखुरे फलंदाज असले पाहिजेत. यावेळी त्यांनी 2011 वर्ल्डकप विजेत्या संघात युवराज सिंग, गौतम गंभीर आणि सुरेश रैना हे तीन डावखुरे फलंदाज होते याकडे लक्ष वेधलं.
"हे फार मोठं आव्हान असणार आहे. तुम्हाला दुर्बिण घेऊन गोष्टी पाहाव्या लागणार आहेत. फॉर्मदेखील तितकाच महत्त्वाचा आहे. तुम्ही योग्य संतुलन साधण्याची गरज आहे. डावखुरे फलंदाजांनी सुरुवात केल्यास फरक पडेल असं तुम्हाला वाटतं का? पण त्यांनी सुरुवात करण्याची गरज नाही. पण पहिल्या तीन ते चारमध्ये ते हवेत. तुम्हाला सर्व पर्याय तपासून पाहावे लागणार आहेत. खरं तर पहिल्या सहा फलंदाजांमध्ये दोन डावखुरे फलंदाज पाहण्यास मला आवडेल," असं मत रवी शास्त्री यांनी मांडलं आहे.
"जेव्हा कधी आपण चांगली कामगिरी केली आहे, तेव्हा डावखुऱ्या फलंदाजांनी मोलाचा वाटा उचलला आहे. 2011 मध्ये गौतम गंभीर, युवराज सिंग आणि सुरेश रैना होते. 1974 मध्ये कालीचर, फेड्रीक्स, लॉइड. 1979 मध्येही असं होतं. 1983 चा एकमेव संघ आहे ज्यामध्ये एकही डावखुरा फलंदाज नव्हता. पण या स्पर्धेत सर्व काही आगळं वेगळंच होतं. 1987 मध्ये ऑस्ट्रेलियाकडे भरपूर डावखुरे होते. 1996 मध्ये श्रीलंकेने पुन्हा एकदा जयसूर्या, अर्जुना रणातुंगा आणि गुरुसिन्हा यांच्यासह सिद्ध केलं. ऑस्ट्रेलियाच्या गिलक्रिस्ट आणि हेडनने ते पुन्हा सिद्ध केलं. तुम्हाला तसा संघ आणि संतुलन तयार करावं लागेल," असं रवी शास्त्री यांनी म्हटलं.
विश्वचषक सुरु होण्यापूर्वी भारतीय संघ डावखुरे फलंदाज म्हणून कोणते पर्याय चाचपडू शकतो असं विचारलं असता रवी शास्त्री यांनी तीन नावं सांगितली. “तुमच्याकडे इशान किशन आहे. विकेटकीपिंग विभागात संजू आहे. डावखुरे फलंदाज म्हणून जैस्वाल, टिळक वर्मा आहेत. या क्षणी कोणत्याही वरिष्ठ खेळाडूची जागा घेऊ शकेल इतकी डाव्या हाताच्या खेळाडूंची प्रतिभा आहे”, असं रवी शास्त्री यांनी सांगितलं.