Sunil Gavskar Birthday: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavskar) आज आपला 74 वा वाढदिवस साजरा करत आहेत. क्रिकेटविश्वात 'लिटिल मास्टर' (Little Master) नावाने प्रसिद्ध असणारे सुनील गावसकर यांनी अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावे केले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावा आणि 34 शतकं ठोकणारे जगातील ते पहिले फलंदाज होते. 5 फूट 5 इंच उंची असणाऱ्या सुनील गावसकर यांनी अनेक मोठ्या खेळी खेळल्या आहेत, ज्या आजही क्रिकेटरसिकांच्या लक्षात आहेत.
जगातील महान फलंदाजांमध्ये गणना होणारे सुनील गावसकर यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. पण त्यांच्या आयुष्याशी संबंधित एक असा किस्सा आहे, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. सुनील गावसकर यांच्या जन्मानंतर अशी एक घटना घडली होती, ज्यामुळे त्यांचं संपूर्ण आयुष्यच बदललं असतं. कदाचित ते कधी क्रिकेटरही होऊ शकले नसते.
सुनील गावसकर यांनी आपलं आत्मचरित्र 'Sunny Days' मध्ये हा किस्सा सांगितला आहे. त्यांनी लिहिलं आहे की, "मी कधीच क्रिकेटर झालो नसतो आणि ना हे पुस्तक लिहिलं गेलं असतं....जर माझ्या आयुष्यात तीक्ष्ण नजरेचे नारायण मासूरकर नसते".
गावसकर यांनी पुस्तकात सांगितलं आहे की "जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा ते मला पाहण्यासाठी रुग्णालयात आले होते. तेव्हा त्यांनी माझ्या कानाजवळ एक जन्मखूण पाहिली होती. दुसऱ्या दिवशी ते पुन्हा आले आणि बाळ हातात घेतलं तेव्हा त्याच्या कानाजवळ ती जन्मखूण नव्हती. यानंतर संपूर्ण रुग्णालयातील बाळांना पाहण्यात आलं. त्यावेळी एका मच्छिमाराच्या पत्नीजवळ मी झोपलेलो असल्याचं आढळलं".
"रुग्णालयातील नर्सने चुकून मला तिथे झोपवलं होतं. कदाचित बाळांना आंघोळ घालताना अदलाबदली झाली होती. जर त्यादिवशी काकांचं लक्ष गेलं नसतं तर आज मी कदाचित मच्छिमार असतो", असं गावसकरांनी पुस्तकात सांगितलं आहे.
सुनील गावसकर यांच्या क्रिकेट करिअरमध्ये त्यांचे वडील मनोहर गावसकर आणि आई मीनल यांचं मोठं योगदान होतं. सुनील गावसकर लहानपणी टेनिसच्या चेंडूने खेळायचे. यावेळी त्यांची आई गोलंदाजी करायची.
सुनील गावसकरांनी 1971 मध्ये वेस्ट इंडिजच्या दौऱ्यातून पदार्पण केलं होतं. त्या मालिकेत गावसकरांनी 4 कसोटी सामन्यात रेकॉर्डब्रेक 774 धावा ठोकल्या. यावेळी त्यांची सरासरी 154.80 इतकी होती. आजही पदार्पणातील मालिकेत इतक्या धावा करण्याचा हा रेकॉर्ड अबाधित आहे.
सुनील गावसकारंनी आपल्या करिअरमध्ये 125 कसोटी सामन्यांमध्ये 34 शतकं आणि 45 अर्धशतकांसह 10 हजार 122 धावा केल्या. दरम्यान, 108 एकदिवसीय सामन्यात 1 शतक आणि 27 अर्धशतकासह त्यांनी 3092 धावा केल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये गावसकरांनी 81 शतकांसह 25 हजार 834 धावा ठोकल्या आहेत.