IND VS ENG 2nd ODI : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे सीरिज खेळवली जात असून यातील दुसरा सामना रविवारी पार पडणार आहे. 9 फेब्रुवारी खेळवण्यात येणारा हा सामना दोनी संघासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. टीम इंडियाने नागपूर येथे झालेला पहिला वनडे सामना जिंकून सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली. त्यामुळे जर दुसऱ्या सामन्यातही इंग्लंडला पराभूत करणे शक्य झाले तर टीम इंडिया सीरिजमध्ये विजयी आघाडी घेईल. तसेच इंग्लंडने हा सामना जिंकल्यास ते सीरिजमध्ये भारताच्या बरोबरीला येतील. तेव्हा या महत्वाच्या सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये काही बदल करू शकतो.
ओडिशाच्या कटक येथील स्टेडियमवर भारत - इंग्लंड दुसरा वनडे सामना खेळवण्यात येणार आहे. दुपारी 1: 30 वाजता सामन्याला सुरुवात होणार असून त्यापूर्वी अर्धातास अगोदर दोन्ही संघाच्या कर्णधारांमध्ये टॉस होईल. रोहित शर्मा आणि हेड कोच गौतम गंभीर हे प्लेईंग 11 मध्ये दोन खेळाडूंना संधी देऊ शकतात. भारतीय गोलंदाज वरुण चक्रवर्ती हा टी 20 मध्ये लागोपाठ चांगलं प्रदर्शन करतोय. इंग्लंड विरुद्ध झालेल्या टी 20 सीरिजमध्ये तो प्लेअर ऑफ द सीरिज सुद्धा ठरला होता, ज्यात त्याने 14 विकेट्स घेतले होते. तेव्हा चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी वरुण चक्रवर्तीला वनडे फॉरमॅटमध्ये टेस्ट करण्यासाठी दुसऱ्या सामन्यात संधी दिली जाऊ शकते. 11 फेब्रुवारी पर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणारे देश त्यांनी जाहीर केलेल्या संघांमध्ये बदल करू शकतात. त्याअनुषंगाने वरुण चक्रवर्तीला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळू शकते.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात वेगवान गोलंदाजांचा अर्शदीप सिंहची निवड करण्यात आली आहे. परंतु पहिल्या वनडेत हर्षित राणाला प्लेईंग 11 मध्ये संधी देण्यात आली. राणाने नागपूर वनडेमध्ये 7 ओव्हरमध्ये 53 धावा देऊन 3 विकेट घेतले. जर बुमराह फिटनेसच्या कारणामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर राहिला तर त्याच्या ऐवजी हर्षित राणाला संधी मिळू शकते. परंतू अर्शदीप सिंहला सुद्धा आयसीसी स्पर्धेपूर्वी प्रॅक्टिस देणं गरजेचं आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात अर्शदिप सिंहला संधी मिळू शकते.
विराट कोहली फिटनेसच्या कारणामुळे पहिल्या वनडे सामन्याला मुकला होता. सामन्याच्या सकाळी त्याच्या गुडघ्याला सूज आल्याने त्याला प्लेईंग 11 मध्ये संधी दिली गेली नव्हती. त्याऐवजी श्रेयस अय्यरला संधी देण्यात आली आणि त्याने अर्धशतक ठोकून त्याचं सोन केलं. मात्र विराट आता पूर्णपणे फिट झाला असून तो इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात खेळेल असे टीम इंडियाच्या बॅटिंग कोचने शनिवारी सांगितले आहे.
रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी