लंडन : आयर्लंडविरुद्धच्या सोप्या परीक्षेनंतर आता भारतीय टीमला इंग्लंडचा कठीण पेपर द्यावा लागणार आहे. इंग्लंड दौऱ्यामध्ये भारत ३ टी-२०, ३ वनडे आणि ५ टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. ३ जुलैपासून टी-२० सीरिजला सुरुवात होणार आहे.
इंग्लंडविरुद्धच्या सीरिजआधी भारताचं टेन्शन वाढलं आहे. कारण भारताचा कर्णधार आणि भरवशाच्या विराट कोहलीची बॅट अजूनही तळपलेली नाही. आयर्लंडविरुद्धच्या दोन टी-२० मॅचची सीरिज ही इंग्लंड दौऱ्याआधी सराव मानली जात होती. पण या सीरिजमध्ये विराट कोहलीनं फक्त ९ रन केले. यातल्या पहिल्या टी-२० मध्ये तर विराट शून्य रनवर आऊट झाला. पीटर चेजनं विराटला माघारी पाठवलं. दुसऱ्या टी-२० मध्ये विराट ओपनिंगला आला होता. पण या मॅचमध्ये विराटला ९ रन करता आले. मागच्या ५ टी-२० इनिंगमध्ये विराट अयशस्वी होत आहे. १३, २६,, १, ० आणि ९ हे विराटचे स्कोअर आहेत. मागच्या ५ इनिंगमुळे विराटची टी-२० मधली सरासरी ५० पेक्षा कमी आली आहे. विराट कोहलीची सरासरी ५२.१५ वरून ४८.५८ वर आली आहे.
२०१४ सालच्या इंग्लंड दौऱ्यामध्ये विराट कोहली अयशस्वी ठरला होता. ५ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये विराटला एकही अर्धशतक बनवता आलं नव्हतं. ५ टेस्ट मॅचमध्ये विराटनं १, ८, २५, ०, ३९, २८, ०, ७, ६ आणि २० रन केल्या. या रन विराटनं १३.५० च्या सरासरीनं रन केले होते. तर वनडेमध्ये विराटनं ०, ४०, १ नाबाद आणि १३ रन केल्या होत्या.
३ जुलै- पहिली टी-२०
६ जुलै- दुसरी टी-२०
८ जुलै- तिसरी टी-२०
१२ जुलै- पहिली वनडे
१४ जुलै- दुसरी वनडे
१७ जुलै- तिसरी वनडे
१ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट- पहिली टेस्ट
९ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट- दुसरी टेस्ट
१८ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट- तिसरी टेस्ट
३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर- चौथी टेस्ट
७ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर- पाचवी टेस्ट