जकार्ता : इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पुरुषांपाठोपाठ भारतीय महिला संघाचंही सुवर्णपदकाचं स्वप्न अधुरे राहिले. मात्र, भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. अंतिम फेरीत जपानने भारतीय महिलांचा २-१ ने पराभव करत सुवर्णपदकावर आपले नवा कोरले.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला ह़ॉकी संघाला रौप्य पदकावर समाधान मानाव लागलं. भारताला ३६ वर्षांनी हॉकीत सुवर्ण पदक जिंकण्याची नामी संधी होतीमहिला हॉकी संघानं उपांत्य फेरीपर्यंत शानदार खेळ केला. मात्र, अंतिम फेरीत या संघाला त्याची पुनरावृत्ती करता आली नाही. जपाननं सुरुवातीपासून सामन्यावर पकड मिळवली आणि आपला विजय सुकर केला.
जपानच्या या विजयामुळे २०२०मध्ये आपल्याच देशात होणाऱ्या टोकिया ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश मिळवला आहे. तिसऱ्या सत्रात जपानने पेनल्टी कॉर्नरवर केलेला गोल हा निर्णयाक ठरला. जपानने पहिल्या मिनिटापासून आक्रमक खेळ करायला सुरुवात केली. अवघ्या दोन मिनीटाच्या खेळांमध्ये जपान संघाच्या आघाडीच्या फळीतल्या खेळाडूंनी भारतीय गोलपोस्टवर दोन हल्ले चढवले. मात्र गोलकिपर सविता आणि कर्णधार राणी रामपाल यांनी भारताचा गोलपोस्ट शाबूत ठेवला.
मध्यंतरीच्या काळात भारतीय खेळाडूंनी जपानचं आक्रमक भेदण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. भारताला पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची एक संधीही आली, मात्र त्यावर गोल करणे भारतीय महिलांना जमले नाही. जपानच्या संघाने मात्र आपल्याला मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेत ११ व्या मिनीटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत सामन्यात १-० अशी आघाडी घेतली.
राणी रामपालने पुन्हा एकदा आपला अनुभव पणाला लावत जपानी खेळाडूकडून बॉलचा ताबा आपल्याकडे घेतला. राणी रामपालने बॉल नवनीत कौरकडे पास देत जपानच्या डी-एरियात प्रवेश केला. नवनीतनेही संधी पाहून केलेल्या पासवर २५ व्या मिनीटाला नेहा गोयलने बॉलला गोलपोस्टची दिशा दाखवत भारताला १-१ अशी बरोबरी साधली.
सामन्यात बरोबरी साधल्यानंतर भारतीय महिलांनी तिसऱ्या सत्रात आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. मात्र, जपानने जोरदार प्रतिहल्ला केला. ४४ व्या मिनीटाला पेनल्टी कॉर्नरवर मिळालेल्या संधीचं गोलमध्ये रुपांतर करुन जपानने तिसऱ्या सत्राच्या अखेरीस सामन्यात पुन्हा एकदा २-१ अशी आघाडी घेतली.