बंगळुरू : खराब फॉर्म आणि त्यानंतर कॉफी विथ करण या शोमध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे भारताचा क्रिकेटपटू केएल राहुल टीमबाहेर होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजमध्ये राहुलचं पुनरागमन झालं. राहुलनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या २ टी-२० मॅचच्या सीरिजमध्ये ४७ आणि ५० रनची खेळी केली. कॉफी विथ करण या शोमध्ये महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे केएल राहुल आणि हार्दिक पांड्याचं निलंबन करण्यात आलं होतं. या कारवाईच्या चौकशीला सुरुवात न झाल्यामुळे दोन्ही क्रिकेटपटूंचं निलंबन मागे घेण्यात आलं. आणि दोघांनी भारतीय टीममध्ये पुनरागमन केलं.
केएल राहुल हा अशा क्रिकेटपटूंपैकी एक आहे ज्याने टेस्ट, वनडे आणि टी-२० या तिन्ही प्रकारांमध्ये शतक केलं आहे. राहुलनं टेस्टमध्ये ५, वनडेमध्ये १ आणि टी-२० मध्ये २ शतकं केली आहेत.
कॉफी विथ करण या शोमध्ये केलेल्या वक्तव्यांमुळे राहुलला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधल्या वनडे सीरिजमध्ये खेळता आलं नव्हतं. पण ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यामध्ये मात्र राहुलचं टीममध्ये पुनरागमन झालं. या सगळ्या वादानंतर राहुलनं पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
'हा काळ कठीण होता. प्रत्येक व्यक्तीला अशा काळातून जावच लागतं. पण यामुळे मला स्वत:वर आणि खेळावर लक्ष द्यायचा वेळ मिळाला. गोष्टी जशा घडतात तशा मी प्रतिक्रिया देत जातो. माझा स्वभाव तसा आहे,' असं राहुल म्हणाला.
'या वादामुळे मी थोडा विनम्र झालो. देशासाठी खेळण्याची संधी मिळाल्याचा मी सन्मान करतो. प्रत्येकाचं देशासाठी खेळण्याचं स्वप्न असतं. त्यामुळे मी काही वेगळा नाही. मी जिकडे आहे त्याला महत्त्व देतो. संधीचा फायदा उचलत आहे आणि क्रिकेटवर काम करत आहे,' असं वक्तव्य राहुलनं केलं.