मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड वन डे सीरिज सुरू झाली आहे. या सीरिजमधील पहिला सामना नुकताच पार पडला. 66 धावांनी भारतीय संघानं इंग्लंडवर विजय मिळवत सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. वन डे सीरिजमधून डेब्यू करणाऱ्या कृणाल पांड्यानं तर इंग्लंडच्या गोलंदाजांना जेरीस आणलं.
कृणाल पांड्याच्या फलंदाजीदरम्यान मैदानात काही क्षण तणावाचं वातावरण होतं. कृणाल इंग्लंडच्या खेळाडूशी भिडला आणि त्यांचा वाद सोडवण्यासाठी अंपयारला हस्तक्षेप करावा लागला. कृणालनं आपलं अर्धशतक पूर्ण केल्यानंतर टॉम कर्रन या इंग्लंडच्या खेळाडूशी कोणत्या तरी कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि कृणालची सटकली.
49व्या ओव्हरमध्ये जेव्हा कृणाल रन काढण्यासाठी पुढे आला तेव्हा त्याची टॉम कर्रनसोबत बाचबाची झाली. टॉम जे बोलला ते ऐकून कृणालचा संताप अनावर झाला आणि त्यांच्यातील वाद विकोपाला गेला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
— tony (@tony49901400) March 23, 2021
कृणालनं याची तक्रार तातडीनं अंपायरकडे केली आणि त्यांचा वाद सोडवण्यासाठी अंपायरला मध्ये पडावं लागलं. कृणालसोबत वाद झाल्यानंतर त्याचा बदला टीम इंडियाच्या खेळाडूंनी आपल्या कामगिरीतून घेतला आहे. टॉमच्या गोलंदाजीवर के एल राहुलनं षटकार ठोकले. तर फलंदाजीदरम्यान टॉम कर्रनची गोची करत केवळ 63 धावा करण्याची संधी दिली.
दुसरीकडे वन डे सीरिजमध्ये डेब्यू करणाऱ्या कृणालनं कमी वेळात अर्धशतक करण्याचा विक्रम केला. 26 चेंडूमध्ये त्याने 50 धावा केल्यानं त्याचं कौतुक होत आहे. टीम इंडियानं इंग्लंडवर 66 धावांनी विजय मिळवला आहे.