MS Dhoni Viral Video: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सध्या मैदानापासून दूर निवांत वेळ घालवत आहे. धोनी सध्या रांचीमधील आपल्या घरी असून मित्रांसह निवांत क्षणांचा आनंद लुटत आहे. 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर धोनी फक्त आयपीएल खेळतानाच दिसतो. या आयपीएलमध्ये त्याने पुन्हा एकदा चेन्नई संघाला विजेतेपद मिळवून दिलं असून, पाचव्यांदा हा पराक्रम केला आहे. पण धोनी मैदानाबाहेर असला तरी चर्चेत मात्र नेहमीच असतो.
महेंद्रसिंग धोनीचा एक मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे त्याची छोटीशी झलक जरी पाहायला मिळाली तरी त्यांना प्रचंड आनंद होत असतो. रांचीमधील त्याच्या घराबाहेर एक झलक पाहण्यासाठी चाहते गर्दी करत असतात. पण रांचीमधील काही तरुणांचं नशीब चांगलंच फळफळलं आहे. याचं कारण त्यांना चक्क धोनीने रस्त्यात थांबवून रस्ता विचारला. यादरम्यान तरुणांचा आपण चक्क धोनीला पाहत आहोत यावर विश्वासच बसत नव्हता.
धोनी रांचीला जाण्यासाठी रस्त्यातील काही तरणांची मदत घेत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. धोनी पहिल्या सीटवर बसलेला असताना, त्याचा मित्र गाडी चालवत होता. यावेळी तरुण धोनीला सांगतो की, "एक सर्कल येईल, तिथून तुम्ही रांचीसाठी जाऊ शकता". यावर धोनी त्याला विचारतो की, "तो दुसरी मूर्ती आहे, तो सर्कल ना". धोनी यावेळी तरुणांशी स्थानिक भाषेत बोलत होता.
यादरम्यान धोनीला पाहिल्याने तरुणांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. यामुळे ते पत्ता सांगत असतानाही धोनीसोबत एक फोटो काढता यासाठी प्रयत्न करत होते. धोनीनेही या तरुणांना नाराज केलं नाही आणि त्यांच्यासह फोटो काढल्यानंतर पुढील प्रवासासाठी रवाना झाला.
This man is so simple and this simplicity is what makes him different from every other celebrity #MSDhoni #Dhoni pic.twitter.com/ErMlX3KGVX
— TAAGASTYA (@LalPatrakar) August 11, 2023
याआधी धोनीचा इकॉनॉमी क्लासमधून प्रवास केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावेली एअर हॉस्टेसने त्याला चॉकलेट्स दिले होते. तसंच रांचीच्या रस्त्यावर रोल्स रॉयस चालवतानाचा एक व्हिडीओ समोर आला होता. दरम्यान, विमान प्रवासात धोनी झोपलेला असताना एका एअर हॉस्टेसने त्याचा व्हिडीओ शूट केला होता. हा व्हिडीओही सोशल मीडियावर चर्चेत होता. पण अनेकांनी त्याच्या प्रायव्हसीत घुसखोरी केल्याने नाराजी जाहीर केली होती.
गुडघा बरा झालेला नसतानाही आयपीएलमध्ये चेन्नईचं नेतृत्व करण्यासाठी धोनी मैदानात उतरला होता. आयपीएलनंतर त्याने मुंबईत गुडघ्यावर उपचार केले. दरम्यान धोनी पुढील आयपीएलमध्ये सहभागी होणार आहे की नाही याबाबत संभ्रम आहे.