Pakistan Exit From The T20 World Cup 2024: पाकिस्तानचा संघ टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेमधून साखळी फेरीमध्येच बाहेर पडला. पाकिस्तानी संघाला भारताबरोबरच अमेरिकेसारख्या नवख्या संघाकडूनही पराभव पत्कारावा लागल्याने जगभरातून पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांनी आपल्या संघावर सडकून टीका केली आहे. क्रिकेट चाहत्यांबरोबरच आजी माजी क्रिकेटपटू, पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाशी संलग्न राहिलेल्या प्रभावशाली व्यक्तींनीही पाकिस्तानी संघात चाललंय तरी काय असं म्हणत बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघावर मैदानातील कामगिरीवरुन टीका केली आहे. असं असतानाच आता पाकिस्तानी संघाचे मैदानाबाहेरचे प्रतापही समोर आले असून दुष्काळात तेरावा महिना म्हणावं त्याप्रमाणे नवीन वादात पाकिस्तानी संघ अडकला आहे.
पाकिस्तानचे माजी यष्टीरक्षक तसेच फलंदाज अतिक उझ झमान यांनी पाकिस्तानी संघावर टीका केली आहे. मैदानामधील कामगिरीबरोबरच पाकिस्तानी संघातील खेळाडूंनी मैदानाबाहेर केलेल्या वर्तवणुकीवरुन अतिक संतापले आहेत. "तुम्ही किती नाटकं करत आहात. आमच्या वेळेस आमच्यासोबत केवळ प्रशिक्षक आणि व्यवस्थापक असायचा. एवढ्या लोकांच्या मदतीनेच संघाचा कारभार चालायचा," असं अतिक यांनी आपला संताप व्यक्त करताना म्हटलं आहे. "आता अधिकारी म्हणून तुमच्यासोबत 17 लोक येतात आणि तुम्ही 17 खेळाडू आहात. असं ऐकलं आहे की तुमच्यासाठी 60 खोल्यांचं बुकींग करण्यात आलं होतं. हाच एक मोठा विनोद आहे. तुम्ही तिकडे क्रिकेट खेळायला गेला होता की सुट्ट्यांसाठी गेला होता?" असा थेट सवाल आतिक यांनी उपस्थित केला आहे.
आतिक यांनी पाकिस्तानी संघ टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या दौऱ्यावर सुट्ट्यांसाठी जात असल्याच्या मनस्थितीमध्ये गेला होता असं म्हटलं आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं खेळाडू, अधिकारी आणि त्याच्याबरोबर एवढ्या अधिक संख्येनं रुम बूक केल्याने ही एखादी आलिशान ट्रीपच वाटत होती. यापूर्वी पाकिस्तानचा संघ कमी अधिकारी आणि तामझाम घेऊन जात होता तेव्हा मैदानावर अधिक परिणामकारक कामगिरी करत होता, असंही आतिक म्हणाले. सध्याच्या संघाला शिस्त नसून त्यांचं खेळावर लक्षही नाही असंही आतिक म्हणालेत.
नक्की वाचा >> 'हरा, मरा, काहीही..', बाबरच्या फिक्सिंगची पाकिस्तानी संसदेत चर्चा! खासदार म्हणाला, 'भारताकडून..'
पाकिस्तानी संघाच्या खेळाडूंबरोबर त्यांच्या कुटुंबियांना प्रवास करण्याची परवानगी देण्याच्या पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाच्या निर्णयावरही आतिक यांनी टीका केली आहे. या अशा परवानगीमुळे खेळाडूंचं लक्ष खेळापेक्षा बाहेरील गोष्टींवर अधिक जाते आणि त्याचा परिणाम मैदानावरील कामगिरीवर होते. अनेक खेळाडू त्यांच्या कुटुंबाबरोबरच जास्त वेळ घालवत होते आणि वेगवेगळ्या गोष्टींना ते अधिक वेळ देत असल्याची टीकाही आतिक यांनी केली आहे.
Atiq-uz-Zaman "17 officials, 60 hotel rooms, families - were they there to play cricket or was it a holiday" #T20WorldCup #Cricket pic.twitter.com/JCUgjoGrMw
— Saj Sadiq (@SajSadiqCricket) June 19, 2024
कुटुंब सोबत असल्याने तसेच आलिशान गोष्टींची हौसमौज करण्याच्या उत्साहामुळे संघाला या दौऱ्यात थोडी सुद्धा शिस्त राहिली नाही. त्यामुळेच या दौऱ्यामध्ये पाकिस्तानी संघाने चांगलं क्रिकेट खेळायचं सोडून सारं काही केलं, असा टोला आतिक यांनी लगावला आहे. तसेच या अशा दौऱ्यांना पत्नी तसेच घरच्यांना सोबत जाण्यास पीसीबीने परवानगी दिल्याने खेळाडूंचं खेळावर कमी आणि ऐश करण्यावर अधिक लक्ष होतं असंही आतिक म्हणालेत. आता आतिक यांच्याप्रमाणे इतरही अनेक माजी खेळाडूंनी या अतिरिक्त रुम बुकिंगवरुन आक्षेप घेतल्याने या 60 खोल्यांच्या बुकिंगचं भूत पाकिस्तानी संघाच्या मानगुटीवर बसून काही मोठी कारवाई होणार का हे येणारा काळच सांगेल.