पाकिस्तान क्रिकेट संघाचा (Pakistan Cricket Team) माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची (Shahid Afridi) मुलगी अंशाचं (Ansha Afridi) नुकतंच लग्न झालं आहे. अंशा आफ्रिदीचं लग्न पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीशी (Shaheen Afridi) झालं आहे. दरम्यान लग्नानंतर सोशल मीडियावर अंशा आणि शाहीन आफ्रिदीची चर्चा सुरु आहे. यादरम्यान त्यांचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. तसंच अंशा आफ्रिदीच्या नावे काहींनी बनावट खाती तयार केली आहेत. यानंतर शाहिद आफ्रिदी संतापला आहे.
शाहिद आफ्रिदीने सोमवारी एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यानंतर त्याने बनावट अकाऊंट्स तयार करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. शाहीद आफ्रिदीने आपल्या मुली सोशल मीडियावर नसून, त्यांच्या नावे असणारे सर्व अकाऊंट्स बनावट आहेत असं ट्वीट केलं आहे. या बनावट अकाऊंट्सविरोधात तक्रार करण्याचं आवाहनदेखील त्यांनी केलं आहे.
Announcement: this is to confirm that my daughters are not on social media and accounts impersonating them are fake and should be reported, fake account pic.twitter.com/AFKE4qQeh1
— Shahid Afridi (@SAfridiOfficial) February 6, 2023
शाहीन आफ्रिदी आणि अंशा आफ्रिदी यांचं 3 मे रोजी कराचीमध्ये लग्न झालं. लग्नाला दोघांचेही जवळचे नातेवाईक उपस्थित होते. काही मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. या लग्नात पाकिस्तान क्रिकेट संघाचे सध्याचे तसंच माजी खेळाडू हजर होते. पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम, सरफराज अहमद यांच्यासह अनेक खेळाडूंनी लग्नाला हजेरी लावली.
शाहीन आफ्रिदी आणि अंशा आफ्रिदी यांचा 2 वर्षांपूर्वीच साखरपुडा झाला होता. मात्र लॉकडाउन आणि नंतर वर्ल्डकपमुळे लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. शाहीन पाकिस्तान संघाचा हुकमी एक्का असून जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांमध्ये गणलं जातं.
शाहीन आफ्रिदी सध्या पाकिस्तान संघाचा स्टार खेळाडू आहे. तर शाहिद आफ्रिदी पाकिस्तानच्या महान खेळाडूंपैकी एक आहे. शाहिदने आपल्या जावयाला जर्सी क्रमांक 10 वापरण्यासाठी विशेष परवानगी दिली आहे.