लंडन : इंग्लंडमधली कामगिरी सुधारण्यासाठी भारतीय क्रिकेटपटू काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी गेले आहेत. यामध्ये चेतेश्वर पुजारा आणि इशांत शर्मा यांचा समावेश आहे. चेतेश्वर पुजारा एप्रिल महिन्यापासूनच काऊंटी क्रिकेट खेळत आहे. तर विराट कोहली जून महिन्यापासून काऊंटी खेळण्यासाठी जाणार होता. पण दुखापतीमुळे विराटला काऊंटी क्रिकेटमध्ये खेळता आलं नाही. यानंतर आता भारताचा ऑफ स्पिनर आर. अश्विनही काऊंटी क्रिकेट खेळणार आहे. अश्विन हा पुन्हा एकदा वोस्टरशायरकडून काऊंटी खेळणार आहे. सप्टेंबर महिन्यात अश्विन वोस्टरशायरकडून एसेक्स आणि यॉर्कशायरविरुद्धची मॅच खेळेल.
मागच्या मोसमामध्येही अश्विन वोस्टरशायरकडून खेळला होता. त्यावेळी अश्विननं ४ मॅचमध्ये २० विकेट घेतल्या होत्या. अश्विनच्या या कामगिरीमुळे वोस्टरशायर मुख्य डिव्हिजनमध्ये गेलं होतं.
इंग्लंडविरुद्धच्या ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला १ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. ही सीरिज ११ सप्टेंबरला संपणार आहे. वनडे आणि टी-२०मध्ये अश्विनला संधी देण्यात आलेली नव्हती.
३१ वर्षांच्या आर. अश्विननं ५८ टेस्टमध्ये २५.३५ च्या सरासरीनं ३१६ विकेट घेतल्या आहेत. तर ३०.४६ च्या बॅटिंग सरासरीनं अश्विननं २,१६३ रन केल्या आहेत. यामध्ये ४ शतकं आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे.