मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडला बीसीसीआयचे लोकपाल डीके जैन यांच्यासमोर हजर राहावं लागणार आहे. परस्पर हितसंबंधांच्या आरोपांमुळे द्रविडला लोकपालची भेट घ्यावी लागणार आहे. १२ नोव्हेंबरला दिल्लीमध्ये द्रविडला लोकपालसमोर हजर राहावं लागेल.
द्रविड हा सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख आहे. मध्य प्रदेश क्रिकेट संघाचे आजीवन सदस्य संजीव गुप्ता यांनी द्रविडच्या परस्पर हितसंबंधांवरून तक्रार केली होती. यानंतर द्रविडला लोकपालकडून नोटीस देण्यात आली. द्रविड हा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख आहे, तसंच आयपीएलची फ्रॅन्चायजी असलेल्या चेन्नईची मालकी असलेल्या इंडिया सिमेंट्स ग्रुपचा उपाध्यक्षही आहे, यावर आक्षेप घेत संजीव गुप्ता यांनी तक्रार केली होती.
राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख झाल्यानंतर आपण काही काळासाठी इंडिया सिमेंट्सचं उपाध्यक्षपद सोडलं आहे, असं द्रविडने सांगितलं आहे. तसंच इंडिया सिमेंट्सकडूनही हीच प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
याआधी सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयवर स्थापन केलेल्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनीही द्रविडला पाठिंबा दिला होता. पुढची २ वर्ष इंडिया सिमेंट्सच्या उपाध्यक्षपदावर नसल्यामुळे हा परस्पर हितसंबंधांचा मुद्दा होत नाही, असं विनोद राय म्हणाले होते.
बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीनेही या मुद्द्यावरून द्रविडची बाजू घेतली आहे. तसंच हितसंबंधांच्या मुद्द्यावर आपली नाराजीही जाहीर केली आहे. परस्पर हितसंबंधांचा मुद्दा उचलणं ही आजकाल फॅशन झाली आहे. बातम्यांमध्ये राहण्यासाठी ही एक पद्धत आहे, अशी टीका सौरव गांगुलीने केली.