कोलंबो : भारताचा स्पिनर रवींद्र जडेजाचं श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टसाठी निलंबन करण्यात आलं आहे. दोन वर्षांच्या काळामध्ये दुसऱ्यांदा गैरवर्तन केल्यामुळे जडेजावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. २४ महिन्यांच्या काळात जडेजाकडे ६ डिमेरीट पॉईंट्स झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. मैदानामध्ये गैरवर्तणूक केल्यामुळे खेळाडूला अंपायर आणि मॅच रेफ्री डिमेरीट पॉईंट्स देतात.
कोलंबो टेस्ट खेळण्यापूर्वी जडेजाकजे तीन डिमेरीट पॉईंट्स होते. ऑक्टोबर २०१६साली इंदोरच्या मॅचमध्ये पिचवर धावल्यामुळे जडेजाला हे पॉईंट देण्यात आले होते. तर श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये जडेजानं स्वत:च्याच बॉलिंगवर त्याच्या हातात आलेला बॉल बॅट्समन दिमुथ करुणारत्नेच्या दिशेनं भिरकावला.
जडेजानं मुद्दामहून हा प्रकार केल्याचं अंपायर रॉड टकर आणि ब्रुस ऑक्सेम्फर्ड यांना वाटल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली. जडेजानंही त्याची ही चूक मान्य केली आहे. रविंद्र जडेजा हा आयसीसीच्या टेस्ट रॅकिंगमध्ये पहिल्या क्रमांकाचा बॉलर आहे.