मुंबई : रोहित शर्मा हा सध्याच्या काळातील आणि आतापर्यंतचा सर्वोत्तम सलामीचा फलंदाज आहे यामध्ये काही दुमत नाही. गेल्या काही वर्षांत रोहितने ओपनिंगची व्याख्या पूर्णपणे बदलून टाकलीये. मर्यादित ओव्हर क्रिकेटमध्ये आपली क्षमता सिद्ध करणारा हा फलंदाज आता कसोटीतही सर्वोत्तम आहे. पण जेव्हापासून रोहितने तिन्ही फॉरमॅटमध्ये आपलं स्थान पक्कं केलंय, तेव्हापासून असा एक फलंदाज आहे ज्याची कारकीर्द जवळपास संपली आहे.
भारतीय कसोटी संघाचा सलामीचा फलंदाज मुरली विजय हा एकेकाळी टीम इंडियाचा सर्वात विश्वासू सलामीवीर होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून विजयला संघात स्थान देण्यात आलेलं नाही. मुरली विजयने त्याचा शेवटचा कसोटी सामना डिसेंबर 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता.
यानंतर मयंक अग्रवाल आणि नंतर रोहित शर्मा यांनी संघातून त्याचा पत्ता कापला आहे. आता विजयला पुन्हा संघात स्थान मिळेल असं वाटत नाही. कारण आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुरली आता फारसा एक्टिव्ह दिसत नाही.
मुरली विजयने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 61 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 3982 धावा केल्या. यादरम्यान त्याने बॅटमधून 12 शतकं झळकवली. त्याला एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये फारशा संधी मिळाल्या नाहीत.
गेल्या 3 वर्षांपासून तो संघाबाहेर आहे आणि आता रोहित शर्मा आणि केएल राहुलचा फॉर्म पाहता आगामी काळात त्याला संघात स्थानही मिळणार नाही, असं अनेकांचं मत आहे.
रोहित शर्माची सध्या केवळ टीम इंडियाचाच नव्हे तर जगातील सर्वोत्तम सलामीवीर फलंदाजांपैकी एक आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या दौऱ्यावर त्याने परदेशात शतक झळकावण्याचाही पराक्रम केला आहे. रोहितच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 3 द्विशतकं आहेत, सध्या दुसरा कोणताही फलंदाज रोहितच्या या विक्रमाच्या जवळपासही नाही.
टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताचा पराभव झाल्यानंतर विराट कोहलीने टी-20 संघाचे कर्णधारपद सोडलं. त्यानंतर बोर्डाने रोहित शर्माला T-20 संघाचा नवा कर्णधार म्हणून घोषित केलं. कायमस्वरूपी कर्णधारपदी विराजमान होताच रोहितने आपली कमाल दाखवायला सुरुवात केली आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली युवा टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकलीये.