मुंबई: प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक स्टेज येते जिथे हातून सगळंच निसटल्यासारखं वाटतं. अगदी सर्वसामन्य माणसापासून ते सेलिब्रिटीपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात ही फेज असते. सचिन तेंडुलकर म्हणजे क्रिकेटविश्वातील देवमाणूस म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. त्याच्या करियरच्या कारकीर्दीत त्याच्याही आयुष्यात अशी एक वेळ आली होती. ज्यामुळे तो खूप तणावाखाली होता. यासंदर्भात स्वत: सचिन तेंडुलकरने खुलासा केला आहे.
माझ्या 24 वर्षाच्या कारकर्दीत मी सर्वात मोठा काळ तणावाखाली घालवला आहे. काही कालावधीनंतर मी ही गोष्ट समजून घेण्यात यशस्वी झालो. सामन्यापूर्वी आलेला तणाव हा तयारीचा एक भाग झाला.
कोरोना व्हायरसमुळे जास्त काळ खेळाडूंना बायो बबलमध्ये वेळ घालवावा लागत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम खेळाडूंच्या मनासिक स्वास्थावर होत आहे. हा तणाव दूर करणं खूप गरजेचं असल्याचं सचिन तेंडुलकरने सांगितलं आहे.
To watch the FREE LIVE Session with Sachin Tendulkar, log into: https://t.co/vX0LGCb6Ah https://t.co/u8nJsc8rTz
— Unacademy (@unacademy) May 16, 2021
'जसा वेळ पुढे जात होता तसं मला समजायला लागलं की खेळण्यासाठी केवळ शारीरिक तयारीच नाही तर मानसिक तयारी करणंही तेवढंच महत्त्वाचं असतं. मी डोक्यानं सामना खेळायला सुरू करण्याआधीच सामना प्रत्यक्षात सुरू झालेला असायचा त्यामुळे खूप तणाव असायचा.'
मी 10-12 वर्षे तणावातून जात होतो. खूपदा तर मला रात्री झोपायचं कसं हेच सुचायचं नाही. झोपच लागत नव्हती. हळूहळू मी स्वत:ला मानसिकरित्या तयार केलं. हा माझ्या खेळण्यापूर्वीच्या तयारीचा भाग आहे हे मी स्वत:ला पटवून दिलं. मला रात्री झोपायचा त्रास होतो हे मी स्वीकारलं आणि डोकं शांत करण्यासाठी हळूहळू काही गोष्टीमध्ये जसं की फलंदाजीचा सराव, टीव्ही पाहणे आणि व्हिडिओ गेम खेळणे तसेच सकाळचा चहा करणं अशा गोष्टी करायला सुरुवात केली.
टेन्शन दूर करण्यासाठी मी चहा करणे स्वत:चे कपडे इस्त्री करणं अशा गोष्टी सुरू केल्या. मी स्वत:ला खेळण्यासाठी तयार करत आहे अशी भावना स्वत:च्या मनात निर्माण केली. त्यामुळे मला टेन्शनमधून बाहेर पडणं सोपं झालं. आता ही सवय झाली आहे.