मुंबई : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झानं मंगळवारी एका गोंडस मुलाला जन्म दिलाय. या बातमीनंतर, हे बाळ कोणत्या देशाचं नागरिक असेल यावरून चर्चा सुरू झालीय... याबद्दल लोक तऱ्हेतऱ्हेची तर्क मांडत बाळाच्या नागरिकत्वावरून प्रश्नांचा भडीमार करत आहेत. असाच काहिसा प्रश्न सानियाचा पती आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकला विचारला गेला. तेव्हा शोएबनं हे बाळ 'ना पाकिस्तानी असेल, ना भारतीय' असं उत्तर दिलंय.
पाकिस्तानी टीम सध्या दुबईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मॅच खेळत आहे. परंतु, शोएब मात्र क्रिकेट बोर्डाकडून परवानगी घेत हैदराबादमध्ये पत्नी आणि मुलाची भेट घेण्यासाठी दाखल झालाय.
या बाळानं भारतात जन्म घेतलाय... त्याची आई सानिया अजूनही भारतीय आहे. त्यामुळे नवजात बालकाला आपोआपच भारतीय नागरिकत्वाचा अधिकार मिळतो.
पाकिस्तानी वर्तमानपत्र 'द एक्सप्रेस ट्रिब्यून'नं दिलेल्या माहितीनुसार, सानिया - शोएबचा मुलगा दुसऱ्याच एखाद्या देशाचं नागरिकत्व ग्रहण करू शकतो... हे खुद्द शोएबनंच मुलाच्या जन्मापूर्वी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये पाक मीडियाशी बोलताना म्हटल्याचं द एक्सप्रेस ट्रिब्युननं म्हटलंय.
भारतीय नागरिक असलेल्या सानियाचा पती शोएब पाकिस्तानी क्रिकेटर आहे. या दोघांनी एकमेकांशी आठ वर्षांपूर्वी विवाह केला होता. लग्नानंतर या दोघांनी दुबईतच घर विकत घेत आपला संसार थाटलाय.
सानिया-शोएबचं बाळ मात्र आडनाव दोघांचंही लावणार आहे. सानियानंच काही दिवसांपूर्वी यावर स्पष्टीकरण दिलं होतं. बाळाचं आडनाव मिर्झा-मलिक असेल, असं तिनं म्हटलं होतं.