महेंद्रसिंग धोनीच्या नावावर विचित्र रेकॉर्ड

आयपीएलच्या या हंगामात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी वेगळ्याच लयीमध्ये दिसतोय. 

Updated: May 4, 2018, 11:29 AM IST
महेंद्रसिंग धोनीच्या नावावर विचित्र रेकॉर्ड title=

मुंबई : आयपीएलच्या या हंगामात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी वेगळ्याच लयीमध्ये दिसतोय. धोनी प्रत्येक सामन्यात धावा करण्यासोबतच संघाला विजय मिळवून देण्यातही मोठा हातभार लावतोय. कोलकाताविरुद्ध धोनीने सर्वाधिक नाबाद ४३ धावा केल्या. २५ चेंडूत त्याने चार षटकार आणि एका चौकारासह ही खेळी साकारली. गेल्या काही वर्षांपासून धोनीच्या फलंदाजीवर अनेक क्रिकेट दिग्गज सवाल उपस्थित करतायत. मात्र या आयपीएलमध्ये धोनीने आपल्या खेळीने टीकाकारांची तोंडे बंद केली. पुढील वर्षी होणारा वर्ल्डकप खेळण्यास पूर्णपणे फिट असल्याचे धोनीने या खेळीने सिद्ध केलेय. गेल्या वर्षी पुणे संघाकडून खेळताना धोनीची कामगिरी तितकीशी खास राहिली नव्हती. त्यामुळे त्याच्याकडून कर्णधारपदही हिरावून घेण्यात आले होते. मात्र धोनी या वर्षी पुन्हा आपल्या जुन्या फॉर्ममध्ये दिसतोय.

दरम्यान, कोलकाताविरुद्ध खेळताना धोनीच्या नावावर इतक्या खराब रेकॉर्डची नोंद झालीये की ज्यामुळे त्याचे फॅन्स निराश होऊ शकतात. कोलकाताचा स्पिनर सुनील नारायणने आपल्या स्पिनवर धोनीला चांगलेच नाचवले. आयपीएलच्या इतिहासात धोनी हा एकमेव फलंदाज आहे जो आतापर्यंत सुनील नारायणच्या ५०हून अधिक बॉलवर बाऊंड्री लगावण्यात यशस्वी ठरला नाहीये. गुरुवारी खेळवण्यात आलेल्या या सामन्यात चेन्नईची सुरुवात चांगली झाली.

फाफ डू प्लेसिस आणि शेन वॉटसन यांच्या सलामी जोडीने संघाला पाचव्या ओव्हरमध्ये ४८ही धावसंख्या गाठून दिली. डू प्लेसिस पुढच्याच ओव्हरमध्ये पियुष चावलाच्या पहिल्या चेंडूवर बोल्ड झाला. सुरेश रैनाने वॉटसनला चांगली साथ दिली आणि दुसऱ्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी केली. ९१ धावसंख्या असताना वॉटसन मोठा शॉट मारण्याच्या प्रयत्नात सुनील नारायणच्या चेंडूवर बाद झाला. त्यानंतर धोनीने जडेजाच्या साथीने पाचव्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली आणि संघाला १७४ ही धावसंख्या गाठून दिली.