दुबई : 2021 च्या T20 विश्वचषक स्पर्धेतील टीम इंडियाचा प्रवास उपांत्य फेरीपूर्वी संपला. सोमवारी म्हणजेच काल भारताचा शेवटचा साखळी सामना नामिबियाविरुद्ध होता, ज्यामध्ये भारताने 9 विकेट्सने विजय मिळवला. हा सामना विराट कोहलीच्या T20 कर्णधारपदातील शेवटचा सामना होता. विराट कोहलीने टी-20 विश्वचषकानंतर टी-20 फॉरमॅटचे कर्णधारपद सोडणार असल्याचे आधीच जाहीर केले होते.
कालच्या मॅचनंतर टी-20 कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहली स्वत:ला रोखू शकला नाही आणि त्याने स्वत: आणि टीम इंडियाबद्दल जाहीरपणे अनेक खुलासे केले.
कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहली म्हणाला, 'आता मला खूप चांगलं वाटत आहे. गेल्या 6 ते 7 वर्षात मी जेव्हा जेव्हा मैदानात उतरलो तेव्हा मी प्रेशरमध्ये आणि जबाबदारीने क्रिकेट खेळलो, ज्याचा शरीरावर खूप परिणाम होतो. टी-20 क्रिकेटमध्ये फारसा फरक पडणार नाही. जर तुम्ही पहिल्या दोन सामन्यांमध्ये पहिल्या दोन ओव्हरमध्ये अधिक चांगल्या प्रकारे खेळला असता तर परिस्थिती काही वेगळी असू शकली असती.'
कोहली म्हणाला की, पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये सुरुवातीची दोन ओव्हर चांगली राहिली असती तर गोष्टी वेगळ्या पद्धतीने घडू शकल्या असत्या. या T20 विश्वचषकात टीम इंडियाला हरण्यामागे न्यूझीलंड आणि पाकिस्तान हेच सर्वात मोठे कारण ठरले. न्यूझीलंड आणि पाकिस्तानने टीम इंडियाचा पराभव करून T20 वर्ल्ड कपमधून बाहेर फेकले. याशिवाय रवी शास्त्री यांचा टीम इंडियासोबतचा प्रशिक्षक म्हणून असलेला करार आता संपला आहे.
टीम इंडियासोबतच्या अंतिम सामन्यानंतर विराट कोहलीने रवी शास्त्री आणि इतर सपोर्ट स्टाफचे आभार मानले. विराट कोहली म्हणाला, 'या सर्व लोकांचे आभार, त्यांनी गेल्या अनेक वर्षांत अप्रतिम काम केले आणि संघाला एकत्र ठेवले. संघाभोवती एक अद्भुत वातावरण होते, ते आमच्या मोठ्या कुटुंबाचा विस्तार आहेत. भारतीय क्रिकेटमध्येही त्यांनी मोठे योगदान दिले आहे. त्या सर्वांचे आपल्या सर्वांच्या वतीने आभार.
याआधी विराट कोहलीनेही आपल्यानंतर टीम इंडियाचे टी-20 कर्णधारपद कोणाला मिळणार याचा खुलासा केला होता. विराट कोहलीने या पदासाठी रोहितच्या नावाचे संकेत दिले आहेत. विराट म्हणाला, 'संघ ज्या प्रकारे खेळला त्याचा मला खूप अभिमान आहे. आता या संघाला पुढे नेण्याची जबाबदारी इतरांवर देण्याची वेळ आली आहे असे मला वाटते. साहजिकच रोहित इथे आहे आणि तो काही काळापासून या सगळ्या गोष्टी पाहात आहेत.
विराटने ज्या पद्धतीने रोहितचे नाव घेतले, त्यावरून आता रोहित या संघाचा नवा कर्णधार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विराट कोहली म्हणाला, 'माझ्यासाठी (संघाचे नेतृत्व करणे) हा सन्मान आहे, मला संधी देण्यात आली आणि मी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. पण ते इतरांसाठी जागा बनवण्याबद्दल आणि पुढे जाण्याबद्दल आहे. कोहलीच्या कर्णधारपदावर रवींद्र जडेजा म्हणाला, "विराटने उत्कृष्ट कर्णधारपद केले, मी त्याच्यासोबत 10 ते 12 वर्षे खेळत आहे. त्याच्या कर्णधारपदाचा मी नेहमीच आनंद लुटला आहे. तो सकारात्मक आणि आक्रमक आहे जे एखाद्या खेळाडूमध्ये हवे आहे.'
कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने T20 क्रिकेटमध्ये 50 सामने खेळले आहेत, 30 जिंकले आहेत आणि 16 गमावले आहेत. कर्णधार म्हणून विराट कोहली टीम इंडियासाठी एकही आयसीसी स्पर्धा जिंकू शकला नाही, त्यानंतर त्याला टी-20 चे कर्णधारपद सोडावे लागले. टी-20चे कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहलीचे वनडे कर्णधारपदही धोक्यात येणार आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत रोहित शर्माकडे एकदिवसीय आणि टी-20 चे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते, अशा बातम्या देखील समोर येत आहेत.