मुंबई : विराट कोहलीला भारतीय वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवल्यानंतर रोहित शर्माकडे नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) या निर्णयाचं काहींनी कौतुक केले, तर काहींनी टीका केली. यामध्ये आता 1983चा वर्ल्डकप विजेता खेळाडू मदन लाल यांनीही या प्रकरणात उडी घेतली आहे.
माजी मुख्य प्रशिक्षक मदन लाल यांनी सांगितलं की, "मला माहित नाही की सिलेक्टर्स यावर काय विचार केला, परंतु मी असं मानतो की कोहली वनडेमध्ये चांगले निकाल देत होता, मग या बदलाची गरज का होती?"
मदन लाल म्हणाले की, जास्त क्रिकेटमुळे कोहलीने टी-20 च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला असावा. पण, वनडेत चांगली कामगिरी करूनही काढणं योग्य नव्हते. मला वाटतं 2023 च्या वर्ल्डकपपर्यंत कोहली कर्णधार व्हायला हवा होता. संघ तयार करणं खूप कठीण आहे, तर तो संपवणं खूप सोपे आहे.
दरम्यान विराटने एकदिवसीय कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर जवळपास 24 तासांनंतर सौरव गांगुली यांनी सांगितलं की, निर्णयानंतर ते आणि सिलेक्टर्स कोहलीशी बोलले होते. कर्णधारपदाच्या कार्यकाळासाठी कोहलीचे आभारही मानले. मात्र, गांगुलीने दावा केला आहे की, त्यांनी कोहलीला टी-20 कर्णधारपद सोडू नये असं सांगितलं होतं. पण त्याने ते ऐकलं नाही.
गांगुलीच्या या वक्तव्यावर मदनलाल म्हणाले की, दोन्ही फॉरमॅटमध्ये वेगवेगळे कर्णधार असल्यामुळे संभ्रमाची स्थिती आहे यावर माझा विश्वास नाही. प्रत्येक कर्णधाराची शैली वेगळी असते. मग गोंधळ कसा? विराट आणि रोहितची कर्णधारपदाची शैली वेगळी आहे, तर महेंद्रसिंग धोनी वेगळ्या शैलीत नेतृत्व करायचा.