नवी दिल्ली : भारतीय टीमचे माजी प्रशिक्षक अनिक कुंबळे आणि विराट कोहलीमध्ये झालेल्या वादाचा पुढचा अंक सुरु झाला आहे. प्रशिक्षक अनिल कुंबळेंना काढण्यासाठी विराट कोहलीनं बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरींना मेसेज केल्याचा गौप्यस्फोट बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीच्या सदस्या डायना एडुलजी यांनी केला आहे. जर प्रशिक्षकाच्या निवडीमध्ये पुरुष टीमचा कर्णधार विराट कोहलीच्या पसंतीची दखल घेतली जाते, तर महिला टीमच्या कर्णधाराला वेगळा न्याय का मिळतो, असा सवाल डायना एडुलजी यांनी केला आहे.
भारतीय महिला टीमसोबत झालेल्या वादानंतर रमेश पोवार यांना प्रशिक्षक म्हणून हटवण्यात आलं. यानंतर एडुलजी यांनी प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांना पत्र लिहिलं आहे. विनोद राय आणि राहुल जोहरी यांनी मागच्या जुलै महिन्यात नियम मोडून रवी शास्त्रींना प्रशिक्षक केल्याचा आरोप डायना एडुलजींनी या पत्रात केला आहे.
''अनिल कुंबळेंबाबत असलेल्या आक्षेपाबद्दल विराटनं राहुल जोहरींना वारंवार मेसेज केले. विराटच्या या मेसेजनंतर कारवाई करण्यात आली आणि भारतीय टीमचे प्रशिक्षक बदलण्यात आले. त्यावेळीही मी माझा विरोध स्पष्टपणे बोलून दाखवला होता. प्रशिक्षक निवडीसाठी असलेल्या सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि लक्ष्मणच्या क्रिकेट सल्लागार समितीला कुंबळेच प्रशिक्षक राहवे, असं वाटत होतं पण विराटनं त्यांचं ऐकलं नाही. प्रशिक्षक बनण्यासाठी रवी शास्त्रींनी वेळेवर अर्जही केला नव्हता. फक्त रवी शास्त्री यांच्यासाठी अर्ज करण्याची तारीखही बदलण्यात आली. शेवटी अपेक्षेप्रमाणेच शास्त्रींना भारतीय टीमचा प्रशिक्षक बनवण्यात आलं. कुंबळेंसारख्या दिग्गज खेळाडूंना खलनायक म्हणून दाखवण्यात आलं. कुंबळेंनी या सगळ्या वादात विनम्रता दाखवली आणि ते पुढे निघून गेले, याबद्दल मी त्यांचा सन्मान करते. तेव्हाही नियमांना धाब्यावर बसवण्यात आल्यामुळे मी विरोध केला होता.'' असं एडुलजी म्हणाल्या.
रमेश पोवार यांना प्रशिक्षक म्हणून कायम ठेवावं अशी मागणी भारतीय टीमची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना यांनी केली होती. प्रशिक्षक निवडीचं चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत न्यूझीलंड दौऱ्यासाठी रमेश पोवारच प्रशिक्षक राहवेत या हरमनप्रीत-मंधानाच्या मागणीचा आपण सन्मान करू शकलो असतो, आणि न्यूझीलंड दौऱ्यात तोच प्रशिक्षक ठेवला असता. टीमच्या दोन वरिष्ठ खेळाडूंचा विचार नजरअंदाज केला जाऊ शकत नाही, असं एडुलजींचं म्हणणं आहे.
भारताच्या पुरुषांच्या टीमसाठीच्या प्रशिक्षकांची निवड सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरव गांगुलीची समिती करते. पण महिला टीमच्या प्रशिक्षकांची निवड करायला या तिघांच्या समितीनं नकार दिला होता. म्हणून बीसीसीआयनं नव्या समितीची नियुक्ती केली आहे.
या समितीमध्ये माजी क्रिकेटपटू कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि रंगास्वामी यांचा समावेश करण्यात आला आहे. महिला क्रिकेट टीमचा प्रशिक्षक होण्यासाठी अनेक इच्छुकांनी अर्ज केले आहेत. या इच्छुकांची मुलाखत कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि रंगास्वामी यांची समिती २० डिसेंबरला मुंबईमध्ये घेईल. भारतीय महिला टीमच्या प्रशिक्षक पदासाठी मनोज प्रभाकर, दिमित्री मास्करेनहास यांनी अर्ज केला आहे. याचबरोबर रमेश पोवार यांनी पुन्हा एकदा भारतीय महिला टीमचा प्रशिक्षक होण्यासाठी अर्ज केला आहे.
नुकत्याच झालेल्या टी-२० वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध फॉर्ममध्ये असलेल्या मिताली राजला वगळण्यात आलं होतं. या मॅचमध्ये भारताचा पराभव झाला होता. टीममधून वगळल्यानंतर मिताली राजनं रमेश पोवार यांच्यावर आरोप केले. हा वाद वाढल्यानंतर भारताच्या टी-२० टीमची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्मृती मंधाना यांनी रमेश पोवार यांची बाजू घेतली.
या सगळ्या वादानंतर प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी हरमनप्रीत-स्मृतीची भेट घेतली. या भेटीवरही डायना एडुलजींनी आक्षेप घेतला आहे. मी हजर नसताना तुम्ही दोन महिला क्रिकेटपटूंची भेट घेतलीत. याबद्दल मी तुम्हाला विचारलं असता, या दोघींना मला भेटायचं होतं, असं उत्तर तुम्ही दिलंत. प्रशासकीय समितीची सदस्य असल्यामुळे माझ्या मतालाही तेवढंच महत्त्व आहे हे तुम्ही विसरलात, असा उल्लेख एडुलजींनी या मेलमध्ये केला आहे. माझ्या सहमतीशिवाय विनोद राय यांच्या आदेशावर कारवाई करु नका, असं एडुलजींनी या मेलमध्ये बीसीसीआयचे सीईओ आणि अधिकाऱ्यांना सांगितलं आहे.