जोहान्सबर्ग : टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध भारत 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळत असून पहिल्या कसोटीत भारताने 113 रन्सने विजय मिळवला. दरम्यान दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी फिटनेसमुळे कर्णधार विराट कोहली बाहेर पडला. त्यामुळे आता विराट पुढच्या सामन्यात खेळणार की नाही असा प्रश्न सर्वांच्या समोर आहे. तर आता याबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे.
टीम इंडियाचा खेळाडू चेतेश्वर पुजारा म्हणाला, "पाठीचं दुखणं असल्याने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये विराट खेळू शकला नाही. मात्र आता त्याची प्रकृती उत्तम आहे. तो लवकरच त्याची फिटनेस टेस्ट करणार आहे."
विराट कोहली पाठीच्या दुखण्याने त्रस्त असल्याने तो दुसऱ्या टेस्टमधून बाहेर पडला. विराटच्या अनुपस्थितीत के.एल राहुल कर्णधारपदाची धुरा सांभाळतोय. दरम्यान मैदानावर कोहलीची कमतरता स्पष्टपणे दिसत होती.
11 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये होणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यापर्यंत कोहली तंदुरुस्त असण्याची शक्यता असल्याचं राहुलने टॉसच्या वेळी सांगितलं होतं. यानंतर आता पुजारा म्हणाला की, टीम फिजिओच कोहलीच्या फिटनेसची नेमकी स्थिती सांगू शकतात.
टीम इंडिया सध्या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. सेंच्युरियन कसोटीत भारताने दक्षिण आफ्रिकेचा 113 धावांनी पराभव केला. सेंच्युरियनमध्ये आशियाई टीमने आफ्रिकन टीमवर विजय मिळवण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ आहे. दरम्यान आजपर्यंत भारताने आफ्रिकेच्या भूमीवर एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही.