मेलबर्न : T20 वर्ल्डकप 2022 मध्ये टीम इंडियाने पहिला म्हणजेच पाकिस्तानविरूद्धचा सामना जिंकला. मात्र यामध्ये आता एक अडचण निर्माण झाली आहे. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी एक मोठा वाद निर्माण झालाय. सिडनीतील सराव सत्रादरम्यान टीम इंडियाला योग्य जेवण देण्यात आलं नाही, यामुळे टीम मॅनेजमेंट नाराज असून बीसीसीआयने आयसीसीकडे तक्रार केलीये. दरम्यान याबाबत माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागने प्रतिक्रिया दिली आहे.
वीरेंद्र सेहवागने टीम इंडियासोबत झालेल्या अशा वागणुकीवर संताप व्यक्त केला आहे. सेहवागने यासंदर्भात ट्विट केलंय. तो म्हणतो, "ते दिवस गेले ज्यावेळी पाश्चिमात्य देशांमध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध व्हायच्या. मात्र आता भारत आता पाहुणचार करण्यामध्ये खूप पुढे गेलाय. भारताकडून मिळणाऱ्या सुविधाही पाश्चात्य देशांपेक्षा चांगल्या आहेत."
बीसीसीआयच्या (BCCI) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सराव सत्रानंतर लंचमध्ये जे जेवण देण्यात आले त्यानंतर भारतीय खेळाडू नाराज आहेत. उद्या सिडनीमध्ये भारताचा नेदरलँडशी सामना होणार आहे. खेळाडूंना जे काही जेवण दिलं जात होतं ते निकृष्ट दर्जाचे होतं. मुख्य म्हणजे यावेळी दिलेलं जेवण फार थंडही होतं. एवढंच नाही तर त्यांना जेवण्यात सँडविच (sandwich) देण्यात आलं. याबाबत बीसीसीआयने आयसीसीकडे तक्रार केली आहे.
दरम्यान बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीम इंडियाने सराव करण्यासही नकार दिला. कारण त्यांना ब्लॅकटाउनमध्ये (Blacktown) सराव करण्यासाठी मैदान देण्यात आले होते. हे मैदान टीम इंडिया राहत असलेल्या हॉटेलपासून 42 किमी अंतरावर असल्याने टीम इंडियाने तिथं जाणंही टाळलं.
भारत विरुद्ध पाकिस्तान - 23 ऑक्टोबर, मेलबर्न (भारत 4 गडी राखून विजयी)
भारत विरुद्ध नेदरलँड्स - 27 ऑक्टोबर, सिडनी
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - 30 ऑक्टोबर, पर्थ
भारत विरुद्ध बांगलादेश - 2 नोव्हेंबर, अॅडलेड
भारत विरुद्ध झिम्बाब्वे - 6 नोव्हेंबर, मेलबर्न