Champions Trophy 2025 : बॉर्डर गावसकर ट्रॉफीनंतर आता भारतीय क्रिकेट प्रेमींना चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे (Champians Trophy 2025) वेध लागले आहेत. 2017 नंतर बऱ्याच वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जाणार असून यासाठी टीम इंडियात कोणत्या खेळाडूंची निवड केली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यातही विकेटकिपर म्हणून टीम इंडिया (Team India) कोणाला चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवण्यासाठी घेऊन जाणार याची चर्चा सध्या सुरु आहे. ऋषभ पंत (Rushabh Pant) , संजू सॅमसन (Sanju Samson) आणि केएल राहुल (KL Rahul) यांच्यात टीम इंडियात विकेटकिपर फलंदाज म्हणून निवड होण्यासाठी मोठी चुरस असेल.
संजू सॅमसनने 2024 मध्ये झालेल्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चांगला परफॉर्मन्स दिला. त्याने 2024 मध्ये 436 धावा केल्या आणि टी 20 मध्ये लागोपाठ दोन शतक ठोकून रेकॉर्ड बनवला. अशी कामगिरी करणारा संजू सॅमसन पहिला खेळाडू ठरला. एवढंच नाही तर संजू सॅमसन हा एका वर्षात टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तीन शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. मागच्यावर्षी केलेलया दमदार परफॉर्मन्समुळे संजू सॅमसन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याची दावेदारी मजबूत करतो. परंतु मीडिया रिपोर्टनुसार चॅम्पियन्स ट्रॉफी सारख्या मोठ्या स्पर्धेसाठी त्याची विकेटकिपर म्हणून निवड होणं कठीण आहे.
RevSportz च्या एका रिपोर्टनुसार चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी विकेटकिपर फलंदाज म्हणून दोन नावांचा विचार केला जात आहे. यात सर्वात आघाडीवर ऋषभ पंत असून दुसरं नाव केएल राहुल याचं आहे. केएल राहुलने ऋषभ पंत उपलब्ध नसताना टीम इंडियासाठी विकेटकिपर म्हणून महत्वाची भूमिका पार पाडली होती. स्टार विकेटकिपर फलंदाज केएल राहुलने 2023 रोजी भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कपमध्ये विकेटकिपर म्हणून चांगलं प्रदर्शन केलं होतं.
RevSportz च्या रिपोर्टनुसार जसप्रीत बुमराह 9 फेब्रुवारी पासून सुरु होणाऱ्या इंग्लंड विरुद्ध वनडे सीरिजमधून जवळपास बाहेर पडला आहे. टीम इंडियाची मॅनेजमेंट बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुद्धा खेळेल की नाही याबाबत चिंतेत आहे. मीडिया रिपोर्टनुसार बुमराह हा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत टीम इंडियाचा भाग असेल परंतु जर त्याची प्रकृती पूर्णपणे ठीक झाली नाही तर तो चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप स्टेज सामन्यातून बाहेर होऊ शकतो. तर नॉकआऊट सामन्यात तो पुनरागमन करेल.