मुंबई : पाकिस्तानविरुद्धच्या मॅचवेळी आशिष नेहराने धोनीला शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ आजही अनेकवेळा व्हायरल होतो. ५ एप्रिल २००५ साली झालेल्या त्या मॅचमध्ये नेहराच्या बॉलिंगवर धोनीने आफ्रिदीचा कॅच सोडला होता.
आशिष नेहराने १५ वर्षानंतर धोनीला शिवी दिल्याचं मान्य केलं आहे. एका मुलाखतीमध्ये नेहराने धोनीला शिवी देऊन चूक केल्याचंही सांगितलं आहे. 'पाकिस्तानविरुद्धच्या सीरिजची दुसरी वनडे विशाखापट्टणमध्ये झाली. या मॅचमध्ये धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं त्याचं पहिलं शतक केलं. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ त्याच सीरिजमधला आहे. सीरिजची चौथी वनडे अहमदाबादमध्ये खेळवली गेली. या मॅचमध्ये मी धोनीला शिवी दिली. धोनी आणि पहिल्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या राहुल द्रविडच्यामधून बॉल गेला आणि शाहिद आफ्रिदीचा कॅच सुटला,' असं नेहराने सांगितलं.
'शाहिद आफ्रिदीने त्याआधी माझ्या ओव्हरमध्ये सिक्स मारली होती. भारत-पाकिस्तान मॅचच्या माझ्यावर आणखी दबाव होता. कॅच सुटल्यामुळे मला आणखी राग आला. अशावेळी खेळाडूंचा पारा चढणं नेहमीचच असतं, पण मला असं करायला नको होतं. या व्हिडिओमध्ये धोनी आहे म्हणून तो एवढा व्हायरल झाला,' अशी प्रतिक्रिया नेहराने दिली.
पाकिस्तानविरुद्धच्या या सीरिजमध्ये भारताचा ४-२ने पराभव झाला होता. भारताने सीरिजच्या सुरुवातीच्या २ मॅच जिंकल्यानंतर उरलेल्या चारही मॅच गमावल्या होत्या.