World Cup 2019: वर्ल्ड कपसाठी भारतीय टीममध्ये आणखी तिघांची निवड, पण...

वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीमची निवड सोमवारी करण्यात आली. 

Updated: Apr 17, 2019, 05:54 PM IST
World Cup 2019: वर्ल्ड कपसाठी भारतीय टीममध्ये आणखी तिघांची निवड, पण... title=

मुंबई : वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीमची निवड सोमवारी करण्यात आली. यानंतर आता वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये आणखी तीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. पण हे तीन खेळाडू वर्ल्ड कपसाठी 'स्टॅण्ड बाय' म्हणून असतील. एखाद्या खेळाडूला दुखापत झाली, तर हे खेळाडू त्याची जागा घेतील. ऋषभ पंत, अंबाती रायुडू आणि नवदीप सैनी या तीन खेळाडूंची स्टॅण्ड बाय म्हणून निवड करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिली आहे.

वर्ल्ड कपच्या भारताच्या १५ सदस्यीय टीममध्ये ऋषभ पंतची निवड न झाल्यामुळे सुनील गावसकर यांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. तर रायुडूला डच्चू देण्याबद्दल गौतम गंभीरने प्रश्न उपस्थित केले होते.

वर्ल्ड कप टीममध्ये निवड न झाल्यामुळे अंबाती रायुडूने विजय शंकर आणि एमएसके प्रसाद यांच्यावर निशाणा साधला होता. यंदाचा वर्ल्ड कप बघण्यासाठी थ्रीडी गॉगलची ऑर्डर केल्याचं ट्विट रायुडूने केलं होतं. विजय शंकरकडे बॅटिंग बॉलिंग आणि फिल्डिंग हे थ्री डायमेन्शन (थ्रीडी) असल्यामुळे त्याची टीममध्ये निवड झाल्याचं निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद म्हणाले होते. यावरूनच रायुडूने टोला हाणला.

'चॅम्पियन्स ट्रॉफीप्रमाणेच आम्ही स्टॅण्ड बाय खेळाडूंचीही निवड केली आहे. जर एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला, तर गरजेनुसार या खेळाडूंना संधी मिळेल', असं बीसीसीआयचा अधिकारी पीटीआयशी बोलताना म्हणाला.

या तीन खेळाडूंबरोबरच खलील अहमद, आवेश खान आणि दीपक चहर हेदेखील वर्ल्ड कपसाठी इंग्लंडला जाणार आहेत. हे तिघं आणि नवदीप सैनी हे भारतीय खेळाडूंना नेटमध्ये बॉलिंग करतील.

'खलील, आवेश आणि दीपक यांची स्टॅण्ड बाय म्हणून निवड करण्यात आलेली नाही. पण गरज पडली तर टीम प्रशासन त्यांच्याबद्दल निर्णय घेऊ शकते. बॅट्समनसाठी मात्र ऋषभ पंत किंवा रायुडू हे पर्याय आहेत,' असं वक्तव्य बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने केलं.

वर्ल्ड कपला जाण्यापूर्वी खेळाडूंची यो-यो टेस्ट घेण्यात येणार नाही, असंही या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं आहे. आयपीएल १२ मे रोजी संपणार आहे. यानंतर लगेचच भारतीय टीम इंग्लंडला रवाना होईल. 'टी-२० क्रिकेट सुरु असल्यामुळे खेळाडूंचं वेळापत्रक व्यस्त आहे. आयपीएल संपल्यानंतर खेळाडूंना आरामाची गरज आहे. हा काही दोन सीरिजमधला वेळ नाही, त्यामुळे यो-यो टेस्ट घेणं योग्य नाही. खेळाडू थकलेले असतील, तर यो-यो टेस्टचा निकाल विपरित येऊ शकतो,' अशी प्रतिक्रिया बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिली.

३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होईल. भारताचा पहिला सामना ५ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. सुरुवातीला भारतीय टीम दोन सराव सामनेही खेळणार आहे. भारताचा पहिला सराव सामना न्यूझीलंडशी २५ मे रोजी आणि दुसरा सराव सामना बांगलादेशशी २८ मे रोजी होणार आहे.

अशी असणार भारतीय टीम

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, केएल राहुल, विजय शंकर