वर्ल्डकप स्पर्धेचं बिगूल वाजण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. सर्व संघ आता बाह्या सावरुन वर्ल्डकप जिंकण्याच्या उद्देशाने तयारीला लागले आहेत. यावर्षीच्या वर्ल्डकपचं यजमानपद भारताकडे असून, सर्व देशाचे संघ भारतात दाखल झाले आहेत. वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वी सर्व संघ सराव सामने खेळणार आहेत. इंग्लंड संघदेखील भारताविरोधातील सामन्यासाठी गुवाहाटीत दाखल झाला आहे. दरम्यान यावेळी इंग्लंड संघाला इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करावा लागला. इंग्लंडचा खेळाडू जॉनी बेअरस्टो याने प्रवासातील एक पोस्ट शेअर केली असून ती व्हायरल झाली आहे.
इंग्लंड संघ गुवाहाटीत भारताविरोधात सराव सामना खेळणार आहे. मात्र गुवाहाटीत पोहोचण्यासाठी इंग्लंड संघाला फारच कसरत करावी लागली. इंग्लंडचा विकेटकिपर जॉनी बेअरस्टो याने इंग्लंड संघ 38 तासांपेक्षा जास्त काळ प्रवास करत असल्याचं सांगितलं आहे. त्याने इंस्टाग्रामला एक पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्याने एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोमधून त्याने इंग्लंडच्या खेळाडूंची प्रवासात नेमकी काय स्थिती झाली आहे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. फोटोत इंग्लंडचे खेळाडू प्रवास करुन फार थकलेले दिसत आहे. तसंच यावेळी त्यांच्या आजुबाजूला प्रवासी उभे आहेत.
जॉनी बेअरस्टो याने फोटो शेअर करताना कॅप्शन दिली आहे की, 'नुसता गोंधळ, 38 तास आणि अद्यापही मोजत आहोत'. यावेळी त्याने हसतानाचा इमोजीदेखील जोडला आहे.
Jonny Bairstow's Instagram story.
England team reached Guwahati in an economy class of a flight. pic.twitter.com/r3Uf3Klchz
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 29, 2023
सराव सामन्यासाठी भारत आणि इंग्लंडचे खेळाडू गुवाहाटीत दाखल झाले आहेत. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, इंग्लंड संघाने मुंबईपर्यंत बिजनेस क्लासने प्रवास केला. लंडन-दुबई-मुंबई हा प्रवास त्यांनी बिझनेस क्लासमधून केला.
वर्ल्डकप सुरु होण्याआधी इंग्लंड दोन सराव सामने खेळणार आहे. इंग्लंडचा पहिला सराव सामना भारताविरोधात होणार आहे. यानंतर भारतीय संघ 3 ऑक्टोबरला थिरुअनंतपुरम येथे नेदरलँडविरोधात त्यांचा दुसरा सामना खेळणार आहे. तर इंग्लंड 2 ऑक्टोबरला बांगलादेशविरोधात दुसरा सराव सामना खेळणार आहे.
भारतीय संघाचा वर्ल्डकपमधील पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरोधात असणार आहे. 8 ऑक्टोबरला चेन्नईत भारत आणि ऑस्ट्रेलिया भिडणार आहे. तर इंग्लंड संघ अहमदाबाद येथे 5 ऑक्टोबरला पहिला सामना खेळणार आहे. यावेळी त्यांच्यासमोर न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे.
इंग्लंड संघ: जोस बटलर (क), मोईन अली, गुस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम कुरन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, जो रूट, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, मार्क वुड, ख्रिस वोक्स .