Mohammed Shami Top World Cup Wicket Taker: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने गुरुवारी मुंबईतील वानखेडेच्या स्टेडियमवर झालेल्या सामन्यामध्ये भन्नाट कामगिरी केली. शमीने 18 धावांच्या मोबदल्यात श्रीलंकेचा अर्धा संघ तंबूत धाडला. या कामगिरीमुळे भारताला 302 धावांनी विजय मिळाला. या विजयानंतर मोहम्मद शमीला त्याच्या यशाचं गुपित काय आहे असं विचारण्यात आलं असता त्याने अगदी सरळ शब्दांमध्ये स्पष्टपणे उत्तर दिलं. विशेष म्हणजे ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतरही शमीने या कामगिरीचं श्रेय चाहत्यांनाच दिलं आहे.
"आम्ही जे कष्ट घेत आहोत त्याचं हे फळ आहे. आम्हाला योग्य लय सापडली आहे. त्यामुळेच तुम्हाला (क्रिकेटच्या मैदानात) ही अशी वादळं पाहायला मिळत आहेत. आमचे गोलंदाज फारच उत्तम कामगिरी करत आहेत," असं शमी भारतीय गोलंदाजीबद्दल म्हणाला. पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये शमीला गोलंदाजीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. "ज्या लयीमध्ये आम्ही गोलंदाजी करत आहोत ते पाहता अशी गोलंदाजी कोणी एन्जॉय करत नसेल असं मला वाटत नाही. आम्ही आमची गोलंदाजी एन्जॉय करत आहोत. आम्ही एकत्र फार कष्ट घेत आहोत. त्यामुळेच तुम्हाला असे निकाल पाहायला मिळतात," असं शमी म्हणाला.
मोहम्मद शमीने 5 विकेट्स घेत वर्ल्ड कपमध्ये 44 विकेट्स घेत सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज होण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला. शमीने जवागल श्रीनाथ आणि जाहीर खानचा विक्रम मोडीत काढला. "नेहमीप्रमाणे मी माझी सर्वोत्त कामगिरी करण्याचा प्रयत्न करतोय. योग्य ठिकाणी बॉल टाकण्याचा आणि तो योग्य लयीमध्ये टाकण्याचा माझा प्रयत्न असतो. ही फार मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे तुमची लय बिघडली तर पुन्हा ती मिळवणं फार कठीण जातं. त्यामुळे सुरुवातीपासूनच योग्य ठिकाणी आणि योग्य लेंथचे चेंडू टाकण्याचा प्रयत्न असतो आणि त्याचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे हेच सातत्याने करत आहे," असं शमी म्हणाला.
यानंतर शमीला तू वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज झाला आहेस पण तुझ्या नावावर एकही एलबीडब्ल्यू विकेट नाही. असं का? असा प्रश्न विचारण्यात आला. "यात काही रॉकेट सायन्स नाही. लयबद्ध गोलंदाजी, उत्तम जेवण, मन शांत ठेवणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांचं जे प्रेम मिळतंय ते. आम्हाला भारतीयांकडून जो पाठिंबा मिळतोय तो भारावून टाकणार असून त्याचा या यशामध्ये मोठा वाटा आहे. तुम्ही भारताबाहेरही खेळता तेव्हा तुम्हाला भारतीयांचा फार मोठा पाठिंबा मिळतो. त्यामुळे मी सर्वांना माझ्या खेळातून आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो," असं शमी म्हणाला. एवढ्या ऐतिहासिक कामगिरीनंतरही आपल्या यशाचं श्रेय शमी चाहत्यांना देत असल्याने त्याच्या विनम्रतेचं आणि साधेपणाचं कौतुक होताना दिसत आहे.