Rohit Sharma Reaction On Sachin Tendulkar Statue In Wankhade: भारत आणि श्रीलंकेदरम्यान आज वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेतील 33 वा सामना खेळवला जात आहे. वर्ल्ड कप 2011 च्या ऐतिसाहिक अंतिम सामन्यानंतर भारत आणि श्रीलंका पहिल्यादाच मुंबईल वानखेडेच्या मैदानावर आमने-सामने येणार आहेत. भारताने 2011 साली 1983 नंतर दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याची किमया केलेल्या सामन्यानंतर पहिल्यांदाच हे दोन्ही संघ या मैदानामध्ये सामना खेळणार आहेत. या सामन्यासाठी दोन्ही संघ काही दिवसांपूर्वीच मुंबईत दाखल झाले असून कसून सराव करत आहेत. दरम्यान कालच या मैदानामध्ये भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या विशेष पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. अनेक मान्यवरांच्या उपस्थित या पुतळण्याचं अनावरण करण्यात आलं त्यावेळी सचिनही उपस्थित होता. वानखेडेवरील या पुतळ्याची सोशल मीडियावर चर्चा असतानाच काल भारत श्रीलंका सामन्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माला या पुतळ्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. हा प्रश्न ऐकून रोहित शर्माने अगदी खास शैलीत या प्रश्नाला उत्तर दिलं.
आज वानखेडेच्या मैदानामध्ये एका फलंदाजाच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. त्या पुतळ्याची स्टेप आणि तुझी फलंदाजीची शैली यामधील साम्य वगैरेबद्दल काय सांगशील? असा प्रश्न एका पत्रकाराने रोहितला विचारला. रोहितला एवढ्या फिरवून हा प्रश्न विचारण्यात आला की त्याला पहिल्यांदा हा प्रश्न समजलाच नाही. त्यानंतर अन्य एका व्यक्तीने सचिन तेंडुलकरच्या पुतळ्यासंदर्भात विचारत आहे असं सांगावं लागलं. त्यावेळेस रोहितने पुतळ्याबद्दल बोलण्यास सुरुवात केली.
"सरावासाठी पोहोचलो तेव्हा पाहिला आम्ही तो पुतळा. मात्र सरावात व्यस्त असल्याने तो पुतळा जवळून पाहता आला नाही. आमच्या मीडिया मॅनेजरने पत्रकार परिषद उशीराने सुरु केली. त्यामुळे फार जवळून पाहता आला नाही आम्हाला हा पुतळा. आम्ही सराव केला. मी फलंदाजीचा सराव करुन इथे आलो आहे. आम्हाला हा पुतळा जवळून पाहण्याची संधी मिळालेली नाही. पण ती मिळेल लवकरच. मी अजून ती स्टेप कोणती आहे पुतळ्याची ते ही पाहिलेलं नाही. मला तो कोणता शॉट आहे हे सुद्धा ठाऊक नाही," असं म्हणत रोहितने इकडे तिकडे पाहिलं असता एका सहकाऱ्याने 'स्ट्रेट लॉफ्टेड शॉर्ट आहे' असं म्हटलं. 'हा स्ट्रेट लॉफ्टेड शॉर्ट आहे तो,' असं रोहित म्हणाला आणि थांबला.
त्यानंतर पुढे काय बोलावं या पुतळ्याबद्दल अजून हे कळालं नाही आणि तो हसून, "आता अजून काय बोलू मी की स्ट्रेट लॉफ्टेड शॉर्टचा पुतळा बनवला आहे," असं म्हणाला आणि अधिक मोठ्याने इकडे तिकडे पाहत हसू लागला. रोहितचा हा गोंधळ पाहून सर्वच उपस्थित पत्रकार हसू लागले अन् प्रेस कॉन्फरन्सच्या हॉलमध्ये एकच हशा पिकला.
1)
Rohit Sharma when asked about sachin tendulkar’s statue #INDvsSL pic.twitter.com/nJirmISQyU
— Shivani (@shivani_45D) November 1, 2023
2)
Q- What's your views on the Sachin's latest statue ? #RohitSharma #INDvsSL pic.twitter.com/QnGMP3eOtI
— Rohit45 (@Pullx45) November 1, 2023
"हा पुतळा फार सुंदर आहे. तुम्हाला सुद्धा तो पाहताना आनंद झाला असेल," असं इंग्रजीमध्ये म्हणत रोहित शर्मा प्रेस कॉन्फरन्समधून उठून निघून गेला.