मुंबई : टेलिकॉम कंपनी एअरटेलनं त्यांच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी खास सुविधा सुरु केली आहे. याचा फायदा एअरटेलच्या सगळ्या ग्राहकांना होणार आहे. एअरटेलच्या वेगवेगळ्या सुविधांसाठी आता एकच बील द्यायची ऑफर एअरटेल घेऊन आली आहे. यासाठी कंपनी एकत्र इंटरफेस 'एअरटेल होम' घेऊन आली आहे. यामध्ये घरात वापरण्यात येणारं ब्रॉडबॅण्ड, फिक्स लाईन, पोस्टपेड मोबाईल आणि डिजीटल टीव्ही याचं एकत्र बिल भरता येणार आहे.
'एअरटेल होम'च्या मार्फत देशातल्या कोणत्याही भागातून दुसऱ्या एअरटेल कनेक्शनला जोडण्यात येऊ शकतं. तसंच ग्राहकाला एक बिल भरल्यावर १० टक्के डिस्काऊंटही मिळणार आहे. सध्या ही सुविधा हैदराबादमधल्या ब्रॉडबॅण्ड ग्राहकांना देण्यात येत आहे. लवकरच ही सुविधा संपूर्ण देशात लागू करण्यात येणार आहे.
या सेवेचा उपयोग करण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या स्मार्टफोनवर 'माय एअरटेल' अॅप डाऊनलोड करावं लागेल. अॅप डाऊनलोड केल्यानंतर एअरटेल होम बॅनरवर क्लिक करावं लागेल. यानंतर प्राथमिक खातं म्हणून घरातलं ब्रॉडबॅण्ड कनेक्शन जोडावं लागेल. यानंतर ग्राहकांना इतर खाती या खात्यात जोडता येऊ शकतात.