मुंबई : नजर हटी, दुर्घटना घटी हे केवळ रस्ते अपघातांच्या बाबतीत लागू होत नाही. तर अगदी तुमच्या मोबाईल स्मार्ट फोनमध्ये देखील असं घडू शकतं. तुमच्या निष्काळजीपणामुळं स्मार्ट फोनमधून तुमच्या बँक खात्यातले लाखो रुपये गायब होऊ शकतात. त्यामुळे कोणत्याही गोष्टीवर क्लिक करताना एकदा नाही तर 10 वेळा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे.
स्मार्टफोनद्वारे तुम्ही विविध प्रकारची बिलं भरत असाल, डिजिटल पेमेंट करत असाल, तर सावधान. कारण तुम्हाला गंडा घालण्यासाठी सायबर चोर वेगवेगळ्या शक्कल लढवत आहेत. गेल्या काही दिवसांपासून कर्ज देण्याच्या नावाखाली बोगस अॅप्लिकेशन लाँच करण्यात आली आहेत.
कमी व्याजदरात कर्ज देण्याचं आमीष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केली जात आहे. अशा फ्रॉड, बोगस अॅप्सपासून सावध राहण्याचा इशारा सायबर दोस्त या गृह मंत्रालयाच्या ट्विटर हँडलवरून देण्यात आला आहे
हे पाळलं तर खातं रिकामं होणार नाही
-नीट खातरजमा केल्याशिवाय मोबाइलमध्ये कोणतेही मोबाइल अॅप डाउनलोड करू नका.
-कर्ज देणा-या कंपन्यांची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरून घ्या.
-कोणतंही कर्ज देणारं अॅप डाऊनलोड करताना काळजी घ्या.
-कागदपत्रं अपलोड करताना, पेमेंट करकताना संबंधित वेबसाईटची URL तपासून घ्या, असं सायबर दोस्तनं बजावलं आहे.
एवढंच नाही तर सायबर गुन्हेगार चक्क पोलिसांच्या नावानं बोगस पॉप अप लिंक पाठवत असल्याचंही आढळलं आहे. अश्लील मजकुरामुळं तुमचा मोबाईल किंवा संगणक ब्लॉक करण्यात येत आहे. तो अनब्लॉक करण्यासाठी दंड भरा, असे पॉप अप मेसेज पाठवले जात आहे. असे पॉप अप मेसेज क्लिक करणं टाळा, असा सल्लाही सरकारकडून देण्यात आला आहे.
स्पॅम कॉलच्या माध्यमातून लोकांना गंडा घालण्याचे प्रकारही वाढले आहेत. सर्वाधिक स्पॅम कॉलच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे असे फोन उचलणं देखील शक्यतो टाळा. कोणत्याही अनोखळी नंबरला आपली कोणतीही माहिती देऊ नका.
ही धक्कादायक माहिती समोर
- यंदाच्या वर्षी भारतात 202 मिलियन स्पॅम कॉल्स करण्यात आले
- याचाच अर्थ एका फोन नंबरवरून दिवसाला 6 लाख 64 हजार स्पॅम कॉल करण्यात आले.
- म्हणजेच प्रत्येक तासाला तब्बल 27 हजार स्पॅम कॉल करून लोकांना त्रास देण्यात आला, अशी धक्कादायक आकडेवारी ट्रकॉलर कंपनीनं जाहीर केलीय...
- यापैकी बहुतांशी कॉल बँक खाते KYC आणि OTP शी संबंधित असल्याचं अहवालात म्हटलंय.
तुम्ही या कॉलर्सना OTP नंबर शेअर केला तर तुम्हाला आर्थिक फटका बसलाच म्हणून समजा. तेव्हा सावध व्हा, केवळ स्मार्टफोन वापरू नका तर खरोखर स्मार्ट व्हा. आपला नंबर किंवा इतर कोणतेही तपशिल अनोळखी व्यक्तीला मेसेज, फोन किंवा इंटरनेटच्या सहाय्याने कोणालाही शेअर करू नका.