महाराष्ट्र दिन ! संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा धगधगता व्हिडीओ १९६०

आंदोलनात मुंबईसाठी मराठी जनता कशी रस्त्यावर आली होती, हे दिसून येत आहे. या आंदोलनात पुरूषांसह महिला देखील रस्त्यावर आल्या होत्या.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 2, 2018, 02:14 PM IST

जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या धगधगत्या आंदोलनाचा व्हिडीओ अखेर समोर आला आहे. या आंदोलनाविषयी आपण आतापर्यंत पुस्तकात वाचलं होतं, पण या आंदोलनात मुंबईसाठी मराठी जनता कशी रस्त्यावर आली होती, हे दिसून येत आहे. या आंदोलनात पुरूषांसह महिला देखील रस्त्यावर आल्या होत्या.

नेहरूंच्या फोटोला चपला लावल्याचं दृश्य

या आंदोलनाची धग किती होती, हे हा व्हिडीओच सांगू शकतो. ब्रिटीश मुव्हीटोनचा हा व्हिडीओ आहे, त्या काळी लंडनमध्ये या बातम्या प्रसारीत होत असत. या व्हिडीओत त्यावेळचे तात्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या फोटोला चपला लावल्याचं देखील दृश्य या व्हिडीओत कैद झालं आहे.

सहा दिवस होती मुंबईत आंदोलनाची धग

गंमत म्हणजे ब्रिटीश मुव्हीटोनने हे आंदोलन म्हणजे एक दंगल असल्याचं सुरूवातीला म्हटलं आहे, यानंतर हे आंदोलन मराठी भाषेसाठी असल्याचंही म्हटलं आहे, या भारतातील सीमावाद असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. हे आंदोलन सहा दिवस चाललं असल्याचंही या व्हिडीओत नमूद करण्यात आलं आहे.

नेत्यांचे अटकसत्र कॅमेऱ्यात कैद

आंदोलनातील नेत्यांचे अटकसत्र दिसून येत आहे, तर अनेक ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांवरही लाठीमार केला आहे. दुसरीकडे जाळपोळीची दृश्य देखील कैद झाली आहेत.

२ हजार कार्यकर्त्यांना अटक

या व्हिडीओत पोलिसांची आंदोलकांमागे सुटलेली भली मोठी फौज दिसते, तसेच पोलिसांशी संघर्ष करणाऱ्या महिला कार्यकर्त्या देखील पुढे आल्या आहेत. या व्हिडीओ बातमीपत्रात असंही म्हटलंय की, २ हजारपेक्षा जास्त लोकांना अटक करण्यात आली आहे, तर ६० ते २०० लोकांचा मृत्यू झाला असल्याचं यात म्हटलं आहे.

मराठी भाषक राज्यासाठी

स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी, संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे १ मे  १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.