ब्युरो रिपोर्ट/
कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युच्या संख्येत रोज वाढ होताना दिसत असून मंगळवारी ३१ मार्च रोजी एका दिवसात ४ हजार ३७३ रुग्णांचा मृत्यू झालाय. कोरोना बाधितांची संख्या साडेआठ लाखांवर म्हणजे ८ लाख ५८ हजार ८९३ इतकी झालीय. इटलीत एका दिवसात ८३७ बळी गेले, तर अमेरिका आणि स्पेनमध्ये एकाच दिवसात प्रत्येकी ७४८ बळी गेले. अमेरिकेत मृतांचा आकडा ३८९० इतका झालाय. कोरोना मृत्युंच्या संख्येत इटली, स्पेननंतर आता अमेरिका आणि फ्रान्स यांनीही चीनला मागे टाकले आहे.
अमेरिका आणि युरोपमध्ये कोरोनाचा कहर थांबायचं नाव घेत नसल्याचं चित्र आहे. जगभरातल्या आघाडीच्या देशांना कोरोनाला आळा घालणं कठीण होऊन बसलं आहे. अमेरिकेत कोरोनाग्रस्तांची संख्या १ लाख ८८ हजारांवर पोहचली असून मृतांचा आकडा ३८९० इतका पोहचला आहे. सर्वाधिक १५५० बळी न्यूयॉर्कमध्ये झालेत.
इटलीत मृतांचा आकडा १२४२८ इतका झालाय. रुग्णांची संख्या १ लाख ५ हजारांवर गेलीय. इटलीत एका दिवसात ८३७ बळी गेले.
स्पेनमध्येही कोरोना रुग्णांचा आकडा ९५ हजारांवर पोहचलाय. एकाच दिवसात ७४८ बळी गेल्यानं मृतांचा आकडा ८४६४ वर पोहचला आहे.
चीनमध्ये कोरोना आटोक्यात आला असून तिथे २४ तासात ५ बळी गेले. चीनमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३५०५ इतकी झालीय.
फ्रान्समध्ये कोरोनाचा कहर वाढलाय. एका दिवसात फ्रान्समध्ये ४९९ बळी गेलेत. फ्रान्सही आता कोरोना बळींच्या बाबतीत चीनच्या पुढे निघून गेलाय. फ्रान्समध्ये मृतांचा आकडा ३५२३ इतका झालाय.
ब्रिटनमध्येही आतापर्यंत १७८९ जणांचा बळी गेलाय. ब्रिटनमध्ये एका दिवसात ३८१ बळी गेले. नेदरलँडमध्ये मृतांचा आकडा एक हजारावर गेलाय. जर्मनीत ७० लाखांहून अधिक लोकांना लागण झाली असून ७७५ जणांचा बळी गेलाय. इराणमध्ये २८९८ जणांचा कोरोनानं मृत्यू झालाय.
याशिवाय बेल्जियममध्ये ७०५, स्वित्झर्लंडमध्ये ४३३, तुर्कीमध्ये २१४ आणि ब्राझीलमध्ये २०२ जणांचा मृत्यू झालाय.